संजय शिरसाटांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची सुमारे ५ हजार कोटी रुपये बाजारभाव असलेली १५ एकर जमीन मंत्री संजय शिरसाठ यांनी इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाच्या वारसांच्या घशात घातली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याविरोधात महा विकास आघाडीच्यावतीने बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी 11 वाजता नवी मुंबई येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावं, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.
याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला, पण विद्यमान मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी २०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे १५ एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा…
– रोहित पवार (@rrpspeaks) 18 ऑगस्ट, 2025
या जमिनीचा बाजारभाव सुमारे ५ हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे १० हजार घरं बांधता आली असती, पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली. एकीकडं ५ हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते, ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, ही विनंती, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांनी ते अध्यक्ष असताना हा निर्णय घेतला आहे. हा सरळसरळ भ्रष्टाचार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत तत्काळ शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
Comments are closed.