रुसच्या व्लादीमीर पुतीन यांचा नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत

नवी दिल्ली : रशिया (रशिया) आणि युक्रेन युद्धाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून हेही युद्ध थांबावे अशी भारतसह जगभरातील अनेक देशांची इच्छा आहे. त्याच अनुषंगाने रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट होऊन चर्चा झाली होती. त्यानंतर, व्लादीमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. अलास्का येथे पुतीन आणि ट्रम्प यांच्यात भेट होऊन युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर पुतीन यांच्यासमवेत फोनवरुन बोलणं झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितलं आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीवर शांतीपूर्ण समाधान काढण्यात यावे, त्यासाठी भारत खंबीरपणे रशियाच्या पाठीशी असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, याबाबत सुरू असलेल्या सर्वच प्रयत्नांना भारताचे समर्थन असल्याचेही मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतीन यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सह्योगावर देखील चर्चा झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्या फोनबद्दल आभार मानले आहेत. विशेष म्हणजे, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर ही बैठक झाली होती. आता, या बैठकीनंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरुन चर्चा झाली आहे. त्यामुळे, या फोनवरील चर्चेला जागतिक स्तरावरही विशेष महत्त्व आहे.

अमेरिका भारतातील संबंधात तणाव

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे तणावग्रस्त आहेत.  त्यातच, अमेरिका आणि भारत यांच्यात 25-29 ऑगस्टपर्यंत व्यापार करारावर चर्चा होणार होती. मात्र, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेचं शिष्टमंडळ व्यापार करारासंदर्भातील पुढील बैठकीसाठी येणार नाही. अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून नवी तारीख निश्चित केली जाईल, असं सांगितलं जातंय. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत पाच वेळा चर्चा झालेली आहे. सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात येणं अपेक्षित होतं. मात्र, सध्या ते लांबणीवर पडलं आहे.

हेही वाचा

भारत-अमेरिका व्यापार करारावर संकट, अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचा दिल्लीचा दौरा रद्द : रिपोर्ट

आणखी वाचा

Comments are closed.