‘ते मोठे स्टार असतीलही', पण सुनील गावस्करांचा ‘असम्मान’? रोहित-कोहलीवर माजी दिग्गज भडकले

माजी दिग्गज क्रिकेटपटू करसन घावरी (Karson Ghavari) यांनी दिग्गज सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांचा ‘असम्मान’ केल्याबद्दल आजच्या पिढीतील स्टार खेळाडूंना चांगलंच सुनावलं आहे. विशेषत: त्यांनी विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांना थेट लक्ष्य केलं. घावरी यांनी शुबमन गिलचं (Shubman gill) उदाहरण देत सांगितलं की, भारतीय कर्णधाराने आपला खेळ सुधारण्यासाठी गावस्करांचा सल्ला घ्यायला हवा.

घावरी काही महिन्यांपूर्वी त्या मीडिया रिपोर्ट्सवर प्रतिक्रिया देत होते, ज्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की टीम इंडियातील काही स्टार खेळाडूंनी गावस्करांविरुद्ध बीसीसीआयकडे तक्रार केली होती. मात्र तो विषय तिथेच दाबला गेला. घावरी म्हणाले, सनी गावस्कर गेल्या 25 वर्षांपासून कॉमेन्ट्री करत आहेत आणि त्यांचे कॉमेंट्स तरुण खेळाडूंना खूपच उपयुक्त ठरतात. दुर्दैव म्हणजे आपले खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात नाहीत, पण इतर देशांचे क्रिकेटर त्यांच्याकडून सल्ला घेत असतात.

पुढे ते म्हणाले, गिलसह प्रत्येक भारतीय फलंदाजाने गावस्करांकडून मार्गदर्शन घ्यायला हवं. मला माहिती नाही गिल गावस्करांकडे गेला की नाही, पण जर गेला नसेल तर त्याने नक्कीच जावं. गावस्करांनी कोहली, रोहित किंवा गिलला सल्ला दिला असं तर कधी कधी ऐकलं, पण हे स्टार खेळाडू गावस्करांकडे स्वतःहून सल्ला मागायला गेले असं ऐकायला कधी मिळालं नाही.

त्याचबरोबर घावरी यांनी रोहित आणि विराट यांना सुनील गावस्करांचा अपमान केल्याबद्दल फटकारलं. काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती की रोहित गावस्करांच्या टीकेमुळे नाराज होता, तर कोहली अनेकदा त्यांच्या मतांवर नाराजी व्यक्त करत आला आहे. 2024 मध्ये गावस्करांनी कोहलीच्या फिरकीपटूंविरुद्धच्या स्ट्राइक-रेटवर टीका केली होती, पण कोहलीने ते सकारात्मकपणे घेतलं नव्हतं. मात्र घावरींचं मत आहे की, रोहित आणि विराट यांनी गावस्करांच्या टीका किंवा सूचना आपल्या भल्यासाठी ऐकायला हव्यात.

घावरी म्हणाले, हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही रोहित असाल किंवा विराट, पण तुम्हाला महान खेळाडूंचा सन्मान करायलाच हवा. गावस्कर काही बोलले, काही सल्ला दिला तर तो तुमच्याच फायद्यासाठी असतो. रवि शास्त्री हे मोकळ्या स्वभावाचे आहेत, टीका करायची असेल तर सरळ करतात. पण गावस्करांचा बोलण्याचा अंदाज वेगळा आहे, ते आपली मते मांडतात पण शास्त्रींपेक्षा पूर्ण वेगळ्या पद्धतीने मांडतात.

Comments are closed.