हा भारतीय खेळाडू अगदी रोहित शर्मा सारखा, वर्ल्ड क्रिकेटचा दुसरा ‘हिटमॅन’! वरूण चक्रवर्तीचं वक्तव्य
वरुण चक्रवर्तीने (Varun chakraworty) 2021 मध्ये टीम इंडियाकडून आपलं पदार्पण केलं होतं. पण भारतीय टीमच्या सेटअपमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला तब्बल 3 वर्षे लागली. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) हा मिस्ट्री स्पिनर आज भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे आणि भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
जेव्हा तो भारतीय संघाचा भाग नव्हता, तेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्ससोबत राहून आपल्या फिटनेस आणि खेळावर मेहनत घेत होता. 2022 आणि 2023 च्या आयपीएल हंगामात त्याच्यात झालेला बदल सगळ्यांच्या नजरेस आला. 2022 मध्ये त्याने 21.45 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या, तर 2023 मध्ये 19.14 च्या सरासरीने 21 विकेट्स मिळवल्या. आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याने जेव्हा विजेतेपद मिळवले, तेव्हा वरुणही त्या संघाचा भाग होता. या काळात त्याने गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) काम केले. हे काही योगायोग नव्हते की गंभीरने त्याला पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवून दिले. त्यानंतर वरुणने मागे वळून पाहिलेच नाही आणि सतत शानदार कामगिरी केली आहे.
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत वरुणने आपल्या पुनरागमनात गौतम गंभीरने केलेल्या मदतीबद्दल सांगितले. त्याने म्हटले, गौती भाईने माझ्या पुनरागमनात खूप मदत केली. आम्ही फार बोलत नाही, पण त्यांनी नेहमी मला आत्मविश्वास दिला. ते नेहमी म्हणायचे की, ‘कोणी तुला दुर्लक्षित केले तरी फरक पडत नाही, मी तुला माझ्या योजनांमध्ये ठेवतो.’
वरुण पुढे म्हणाला, यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. गौती भाई सल्लागार म्हणून ड्रेसिंग रूममध्ये योद्ध्याची मानसिकता आणतात आणि तीच आमच्यासाठी केकेआरमध्ये तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीत फायदेशीर ठरली. भारतीय व्हाईट बॉल सेटअपमधील खेळाडूंना आशिया कपपूर्वी (Asia Cup) आराम मिळाला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. या काळात वरुणने तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये भाग घेतला आणि आगामी मालिकांसाठी तयारीवर लक्ष केंद्रित केले.
त्याने सांगितले, आशिया कपनंतर अनेक व्हाईट बॉल मालिका येणार आहेत आणि त्या खूप आव्हानात्मकही असतील. त्यामुळे माझे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या मालिकांमध्ये उत्तम कामगिरी करणे, जेणेकरून विश्वचषकात आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह उतरता येईल. मी जी प्रक्रिया विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे.
पुनरागमनानंतर वरुण सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळतो आहे. त्याला वाटते की सूर्याकडून मिळणारी कॅप्टन्सीची शैली रोहित शर्मासारखी (Rohit Sharma) आहे. वरुण म्हणाला, तुम्ही मैदानावर सर्वस्व देता, जिंकता की हारता याने फरक पडत नाही. सूर्या अगदी रोहित शर्मासारखा आहे. हेच मी पाहिले आहे. तो खूपच स्मार्ट आहे. मुंबई इंडियन्समध्ये असताना त्याला महान कर्णधारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे त्याला अनुभवही खूप आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे आणि कधीच गोलंदाजांवर दबाव आणत नाही. त्याच्यासारखा कर्णधार मिळणे म्हणजे गोलंदाजांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
Comments are closed.