निम्मा संघ पक्का, आता कोणाला बसणार धक्का, आशिया चषकासाठी आज ‘टीम इंडिया’ची घोषणा होणार

बहुचर्चित इंग्लंड दौऱ्यावर मर्दुमकी गाजवून हिंदुस्थानी क्रिकेटपटू मायदेशी परतलेत. मात्र, आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. 9 सप्टेंबरपासून आशिया उपखंडातील ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू होतेय. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने रविवारीच आपला संघ जाहीर केलाय. आता उद्या (दि. 19) जाहीर होणाऱ्या हिंदुस्थानी संघाकडे हिंदुस्थानी चाहत्यांसह अवघ्या क्रिकेटविश्वाचेही लक्ष लागले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जाहीर होणाऱया 17 सदस्यीय संघातील जवळपास आठ खेळाडूंचे स्थान पक्के असल्याचे मानले जात आहे. मात्र, उर्वरित 9 खेळाडूंची निवड करताना कोणाकोणाला धक्के बसणार हे आता काही तासांतच कळणार आहे.

गिल आणि श्रेयसला मिळेल का संधी?

सूर्यकुमार यादव फिट झाल्याने ‘टीम इंडिया’च्या टी-20 संघाचा कर्णधारपदाचा प्रश्न संपल्यात जमा आहे. मात्र, उर्वरित फलंदाजांसाठी तगडी स्पर्धा आहे. मधल्या फळीत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, यशस्वी जैयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, रियान पराग आणि श्रेयस अय्यर यांच्यात रस्सीखेच असेल. इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेत शुभमन, यशस्वी आणि श्रेयस यांना स्थान मिळाले नव्हते. मात्र, आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर हे तिघे पुन्हा चर्चेत आले आहेत. यापैकी फक्त एक किंवा दोन खेळाडूंनाच आशिया चषकासाठी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या अभिषेक आणि तिलक हे टी-20 फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर आहेत. त्यामुळे त्यांची निवड जवळपास पक्की मानली जाते. संघ व्यवस्थापनाकडून पराग किंवा रिंकू यापैकी एकाला संधी मिळू शकते. म्हणजे सूर्याशिवाय आणखी चार फलंदाज संघात असतील.

यष्टिरक्षकाच्या शर्यतीत सॅमसन आघाडीवर

आशिया चषकासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून अनुभवी संजू सॅमसनची दावेदारी सर्वात भक्कम आहे. गेल्या वर्षभरात त्याने तीन टी-20 शतके ठोकली आहेत. ऋषभ पंत अजूनही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे ध्रुव जुरेल, जितेश शर्मा आणि प्रभसिमरन यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

बुमराकडे गोलंदाजी ताफ्याची धुरा

जसप्रीत बुमरासह अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा असा प्रतिभावान वेगवान गोलंदाजांचा ताफा ‘टीम इंडिया’च्या दिमतीला आहे. वर्पलोड मॅनेजमेंटमुळे बुमराला इंग्लंड दौऱयावर काही कसोटींत विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आशिया चषकासाठी आपण पूर्णतः फिट असल्याचे बुमराने कळविले आहे. बुमरा आणि अर्शदीप यांची निवड निश्चित मानली जाते. उर्वरित चार वेगवान गोलंदाजांपैकी दोन खेळाडूंना संधी मिळेल. सिराजला विश्रांती मिळू शकते, तर प्रसिध आणि हर्षित आयपीएलमधील कामगिरीमुळे आघाडीवर आहेत. फिरकी विभागात अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू गोलंदाजांसह कुलदीप यादव, रवि बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती असे तगडे पर्याय आहेत.

अक्षरकडे उपकर्णधारपद?

‘टीम इंडिया’ने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधारपद होते. मात्र, गिलला विश्रांती मिळाल्यावर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेलने उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आता आशिया चषकामध्ये उपकर्णधार कोण होणार, हा निवड समितीसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आशिया चषकानंतर लगेचच हिंदुस्थानची विंडीजविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे.

Comments are closed.