चिनी परराष्ट्रमंत्री आगमन
एस. जयशंकर यांच्याशी चर्चा, पंतप्रधान मोदी यांनाही भेटणार, महत्वाचे करार होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आगमन झाले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी प्रथम भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. मतभेदांचे रुपांतर संघर्षात होऊ नये, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, असे स्पष्ट केले गेले.
वांग यी यांची आज मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होणार आहे. द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक, सीमावाद आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये काही व्यापारी करारही केले जाऊ शकतात, असे दिसून येत आहे.
स्थिर सहकार्याची अपेक्षा
दोन्ही देशांमधील संबंध स्थिर आणि सहकार्याच्या पायावर उभे असावेत, अशी भारताची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही काळानंतर शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. त्यावेळी त्यांची चीनचे नेते क्षी जिनपिंग यांच्याशी थेट चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच दौऱ्याच्या सज्जतेविषयीही वांग यी भारताशी चर्चा करणार आहेत.
डोभाल यांची चीनभेट
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी नुकताच चीनचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी वांग यी आणि क्षी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली होती. अमेरिकेने नुकतेच भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. त्याचे क्रियान्वयन 27 ऑगस्टपासून होणार आहे. अमेरिकेने चीनवरही 30 टक्के व्यापारी कर लागू केला आहे. या घडामोडींची पार्श्वभूमी या दौऱ्याला आहे.
माओ निंग यांचे विधान
चीनच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते माओ निंग यांनी वांग यी यांच्या भारत भेटीतून सकारात्मक फलनिष्पत्ती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख संघर्षानंतर प्रथमच विश्वासाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. वांग यी यांच्या भारतदौऱ्यातून चीनची भारतासंबंधीची आस्था दिसून येते. भारताशी मैत्रीचे आणि स्थिर आर्थिक संबंध असावेत, ही चीनची इच्छा आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील. तसेच दृढ सहकार्य होईल, असे प्रतिपादन माओ निंग यांनी केले आहे.
अमेरिकेच्या धोरणाशीही संबंध
अमेरिकेने नव्याने अवलंबिलेल्या व्यापार शुल्क धोरणामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होणे शक्य आहे. या धोरणाचे निश्चित चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यामुळे विविध देशांमधील पारंपरिक संबंधही परिवर्तनाच्या मार्गावर आहेत. वांग यी यांच्या भारतभेटीला हे सारे संदर्भ आहेत. यातून भारत आणि चीन एकमेकांच्या अधिक जवळ आल्यास ती एक सकारात्मक घटना असेल, असे भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील अभ्यासकांचे मत आहे.
Comments are closed.