पंतप्रधान मोदी आणि पुतीनची चर्चा
अलास्का बैठकीतील चर्चा, प्रस्ताव यांच्यावर बोलणे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरुन महत्वाची चर्चा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतीच अलास्का येथे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेची माहिती पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याविषयी गुप्तता पाळण्यात आली असली, तरी या चर्चेमुळे नजीकच्या काळात महत्वाच्या घडामोडी होणे शक्य आहे.
ही माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे आभार मानले आहेत. पुतीन यांनी स्वत: हा दूरध्वनी केला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे. तसेच दोन्ही देशांमधील वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघावा, अशीच भारताची इच्छा असल्याचा पुनरुच्चार या दूरध्वनी चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
दोन आठवड्यांमध्ये दोनदा चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात गेल्या दोन आठवड्यांमध्ये दोनदा दूरध्वनीवरुन चर्चा झाली आहे. प्रथम चर्चा अलास्का भेटीच्या आधी झाली होती. त्या चर्चेत पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनशी होत असलेल्या संघर्षासंबंधी आणि सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भातली माहिती दिली होती.
व्यापार शुक्लाची पार्श्वभूमी
रशियाकडून कमी दरात इंधन तेल खरेदी केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. या घटनेची पार्श्वभूमी या चर्चेला आहे. अध्यक्ष पुतीन यांनी हा मुद्दा अध्यक्ष ट्रंप यांच्यासमवेत अलास्का येथे चर्चा करताना उपस्थित केला होता की नाही, याविषयी निश्चितपणे माहिती कोणत्याही स्रोतांकडून देण्यात आलेली नाही. मात्र, भारतावर अमेरिकेने लागू केलेल्या कराचा अप्रत्यक्ष परिणाम रशियावरही होणार असल्याने कदाचित हा मुद्दाही अलास्का येथील बैठकीत चर्चिला गेला असावा, अशी शक्यता आहे.
भारताकडून स्वागत
अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या चर्चेचे भारताने स्वागत केले होते. सध्याचा काळ हा युद्धाचा नाही. शांततेच्या आणि चर्चेच्याच मार्गाने संघर्षांवर तोडगा काढला गेला पाहिजे, ही भारताची प्रारंभापासूनची भूमिका असल्याचा पुनरुच्चारही भारताने केला आहे.
ट्रंप-झेलेन्स्की चर्चा महत्वाची
अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार सोमवारी दुपारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री 11 वाजता) डोनाल्ड ट्रंप आणि युव्रेनचे नेते वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात चर्चा होणार आहे. गेली अडीच वर्षे चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धावर या चर्चेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोन्ही नेते काय बोलणार आणि या बैठकीतून काय निष्पन्न होणार, यावर भारताचेही बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे भारताही या चर्चेकडे उत्सुकतेने पहात आहे.
Comments are closed.