वरण, भात, कढी म्हणजे गरिबांचे जेवण! विवेक अग्निहोत्रीने महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना नावे ठेवले, सोशल मीडियावर वादंग

वरण, भात, कढी हे गरीब शेतकऱ्यांचे जेवण आहे, असे म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना नावे ठेवले. यामुळे सोशल मीडियावर चांगलेच वादळ उठले असून विवेक अग्निहोत्री आणि त्याची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्यावर चौफेर टीका होत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता त्याचा ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘कर्ली टेल्स’ला विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीने मुलाखत दिली. या मुलाखतीत पल्लवी जोशी हिने बोलण्याच्या ओघात विवेकने महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची खिल्ली उडवली होती, मात्र आता त्याला तेच खावे लागत असल्याचे म्हटले.

मुलाखतीत दोघांना खाद्यपदार्थांबाबत विचारले असता पल्लवी जोशी म्हणते की, ‘मी महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल सांगते. मी जे काही बनवायचे ते यांना आवडत नव्हते. मी बनवलेल्या जेवणाला ते गरिबांचे जेवण म्हणायचे. खरे तर मराठी जेवण खूप साधे असते. आपण सगळ्या भाज्या चिरून खातो. पण यांनी मला आयुष्यभर हे गरिबांचे जेवण आहे असे ऐकवले.’

याबाबत विवेक अग्निहोत्री म्हणाला की, ‘मी दिल्लीचा असून तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी वगैरे जेवण असे मसालेदार जेवण असते. त्यात तूप, तेल तरंगत असते. आमचे नवीनच लग्न झालेले. ही म्हणाली वरण, भात खा. म्हटले चला वरण, भात खाऊया. नंतर म्हणाली कढी खा. मला वाटले कढी म्हणजे, त्यावर तूप तरंगत असेल, लाल मिरचीचा तडका दिलेला असेल. पण मराठी लोकांची कढी म्हणजे हेल्थ फूड सारखे असते. मला धक्काच बसला. हे तर शेतकऱ्यासारखे गरीब जेवण आहे आणि कसे हिच्यासोबत लग्न करणार असे वाटले.’

विवेक अग्निहोत्रांची महाराष्ट्रातील पाककृतीची अनपेक्षित प्रतिक्रिया

#Vivekagnihotrri #pallavijoshi #Bengalfiles #Maharastrianfood

द्वारा पोस्ट केलेले कुरळे किस्से रविवारी, 17 ऑगस्ट 2025 रोजी

दरम्यान, विवेक अग्निहोत्री याचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. वरण, भात हे सात्विक अन्न असून आयुर्वेदाने ते मान्य केलेलं आहे. त्याला नावे ठेऊ नको, असे नेटकऱ्यांनी सुनावले.

Comments are closed.