टी20 मध्ये मैदान गाजवणारा डेवाल्ड ब्रेव्हिस लवकरच वनडे संघात, कर्णधाराने दिला मोठा संकेत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑगस्ट रोजी केर्न्स येथील काझाली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत हे संकेत दिले. डेवाल्ड ब्रेव्हिसने यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत शानदार कामगिरी केली. ब्रेव्हिसने तीन सामन्यांच्या मालिकेत 180 धावा केल्या, ज्यात एक शानदार शतकाचा समावेश आहे.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत टेंबा बावुमा म्हणाले की ब्रेव्हिसला आगामी एकदिवसीय मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जेव्हा नवीन चेहरे संघात येतात तेव्हा उत्साह वाढतो. सर्वांच्या नजरा ब्रेव्हिसवर आहेत, त्याने त्याच्या कामगिरीने तो काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये काय नवीन आणतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे?
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांनी देखील ब्रेव्हिसची प्रशंसा केली आहे. त्यांनी सांगितले की, “माझ्या मते कधी कधी आपण गरजेपेक्षा जास्त विनम्र होतो. आपण जगाला आपल्या खरी क्षमता किती आहे याची जाणीव करून देत नाही. पण ब्रेव्हिस तसे करत नाही. अर्थातच त्याचे वय वाढत जाईल, पण मला आशा आहे की तो 22 वर्षांच्या खेळाडूप्रमाणेच खेळत राहील. अनेकदा अनुभवासोबत खेळाडू आपला खेळण्याचा पद्धतीत बदल करतात.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आजकाल बदलाच्या टप्प्यातून जात आहे. हेनरिक क्लासेनच्या निवृत्तीनंतर आफ्रिकन संघाचा हा पहिलाच एकदिवसीय सामना असेल. या मालिकेत त्यांच्याकडे मधल्या फळीत डेव्हिड मिलरही नसेल. अशा परिस्थितीत, ट्रिस्टन स्टब्ससह डेवाल्ड ब्रेव्हिसला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळू शकते. आता ब्रेव्हिस एकदिवसीय सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
Comments are closed.