कोल्हापूर सर्किट बेंचपुढे पहिल्याच दिवशी 120 केसेस, गोकुळ संचालक मंडळाविरुद्ध खटला दाखल

कोल्हापुरात आजपासून सर्किट बेंचच्या न्यायालयीन कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर गर्जना संघटनेचे अध्यक्ष व आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील श्री महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी खटला दाखल केला. हा लढा संचालक मंडळ बरखास्ती, आर्थिक वसुली आणि अपात्रता होईपर्यंत सुरू राहील, असे बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर आल्या.

गोकुळ दूध संघात 2011 पासून अनागोदी कारभार आणि आर्थिक अनियमितता सुरू आहे. या विरोधात त्या-त्या वेळी दूध विकास विभागाकडे तक्रारीनंतर बाळासाहेब मसुगडे या शासकीय वर्ग एक लेखापरीक्षकाकडे चाचणी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले गेले. त्यांनी दि. 22 मे 2022 मध्ये चाचणी आणि विशेष लेखापरीक्षण मधील त्रुटी आणि दुरुस्ती अहवाल सादर केला होता. सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षण सादर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुरुस्ती करून त्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून,आर्थिक नुकसानीच्या वसुलीसह संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होणे अपेक्षित होते, असे बेलवाडे म्हणाले.

Comments are closed.