आशिया कपनंतर जसप्रीत बुमराहचा रोडमॅप काय असेल? चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांनी केला खुलासा
आशिया कपसाठी 15 जणांचा भारतीय संघ (Asia Cup Squad India 2025) जाहीर झाला आहे. या स्क्वाडमधील सर्वात मोठं नाव आहे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). बुमराह संघात असला तरी भारताला प्रतिस्पर्धी संघावर मानसिक बढाई मिळते. बुमराह इतकाच खास आहे की, त्याच्या अचूक यॉर्कर, फलंदाजांना सेट करून बाद करण्याची कला अप्रतिम आहे. पण, आशिया कपमध्ये तो खेळणार का यावर शंका होती. आता चीफ सेलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी स्पष्ट केलं आहे की, आशिया कप आणि त्यानंतर बुमराहचा रोडमॅप काय असणार आहे.
टीम इंडियाचे चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर खेळाडूंना चांगला ब्रेक मिळाला होता. टीम मॅनेजमेंट आणि फिजिओ सतत संपर्कात असतात. हे आत्ताच सुरू झालेलं नाही, बुमराहच्या दुखापतीपूर्वीपासूनच आम्ही त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे, कारण आम्हाला माहिती आहे की तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे.
अजित आगरकर पुढे म्हणाले, प्रत्येक मोठ्या सामन्यासाठी आम्हाला बुमराह हवाच. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक सामना महत्त्वाचाच असतो. बहुतांश वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यात येतं. मागच्या 2-3 वर्षांत बुमराहला वारंवार दुखापती झाल्या आहेत, म्हणून त्याला विशेष जपणं गरजेचं आहे. कारण तो एक विलक्षण गोलंदाज आहे.
2024 टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने एकही टी20 सामना खेळलेला नाही. गेल्या वर्षीच्या विश्वचषकात बुमराहने 8 सामन्यांत 15 विकेट घेतल्या होत्या. आत्तापर्यंत त्याने 70 टी20 सामन्यांत 89 विकेट घेतल्या असून, टी20 फॉरमॅटमध्ये पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. सध्या 99 विकेटसह अर्शदीप सिंह (Arshdeep singh) पहिल्या क्रमांकावर आहे.
Comments are closed.