Asia Cup 2025: टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये या 5 मोठ्या मुद्द्यांवर झाली सर्वाधिक चर्चा
बीसीसीआयने आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांनी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) हा संघाचा कर्णधार असेल, तर शुबमन गिलला (shubman gill) उपकर्णधार नेमण्यात आले आहे. यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) मात्र संघात स्थान मिळालेलं नाही.
संघात फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह यांचा समावेश झाला आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांना संघात घेतलं आहे.
1. शुबमन गिल ठरला उपकर्णधार
या संघातील सर्वात मोठी बाब म्हणजे शुबमन गिलला (Shubman gill) उपकर्णधार करण्यात आलं आहे. इंग्लंड दौर्यावर कसोटी संघाचं नेतृत्व करताना त्याने 5 कसोटी सामन्यांत तब्बल 754 धावा केल्या होत्या. गिलला उपकर्णधार बनवण्यामागचा उद्देश म्हणजे निवड समिती आता त्याला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी योग्य खेळाडू मानत आहे.
2.यशस्वी जयस्वालला संघात स्थान नाही
भारताचा दिग्गज ओपनर यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) मुख्य संघात घेण्यात आलेलं नाही. त्याला फक्त स्टँडबायमध्ये ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत त्याने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 723 धावा केल्या आहेत. त्याचा शेवटचा सामना जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला होता.
3. श्रेयस अय्यरलाही संधी नाही
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणारा श्रेयस अय्यर (Shreyas iyer) यावेळी संघाबाहेर आहे. त्याने आत्तापर्यंत भारतासाठी 51 टी-20 सामने खेळून 1104 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने 17 सामन्यांत 604 धावा केल्या होत्या आणि 6 अर्धशतकं झळकावली होती. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स अंतिम फेरीत पोहोचली होती.
4. साई सुदर्शनलाही स्थान नाही
आयपीएल 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा साई सुदर्शनलाही (Sai surdarshan) संघात घेतलं नाही. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने 15 सामन्यांत 759 धावा केल्या होत्या. आत्तापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 60 सामने खेळून 2271 धावा केल्या आहेत आणि दोन शतकं ठोकली आहेत.
5.प्रसिद्ध कृष्णा संघाबाहेर
आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णालाही (Prasiddh Krishna) जागा मिळाली नाही. त्याने 15 सामन्यांत 25 विकेट घेतल्या होत्या. आत्तापर्यंत त्याने 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 8 विकेट घेतल्या आहेत, तर एकूण टी-20 कारकिर्दीत त्याच्या नावावर 97 सामन्यांत 106 विकेट आहेत.
Comments are closed.