मनूच्या कांस्यनंतर रश्मिकाचा ‘सुवर्ण’वेध

हिंदुस्थानची स्टार नेमबाज मनू भाकरने मंगळवारी 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यानंतर लगेचच रश्मिका सहगलने ज्युनियर महिलांच्या एअर पिस्टलमध्ये हिंदुस्थानला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. हिंदुस्थानी नेमबाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 11 पदकांची लयलूट केली आहे.

रश्मिकाचा दुहेरी धमाका

रश्मिकाने पात्रता फेरीत 582 गुण मिळविले होते. तिने वंशिका चौधरी (573) आणि मोहिनी सिंह (565) यांच्यासह सांघिक सुवर्णपदकही पटकाविले. यामुळे तिने वैयक्तिक तसेच संघ गटातील दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. कोरियाच्या जिन यांग हिने 241.6 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. मनू भाकरने आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत 219.7 गुणांची कमाई करीत तिसरे स्थान मिळविले. चीनच्या कियान्के मा हिने 243.2 गुणांसह सुवर्णपदक, तर कोरियाच्या जिन यांगने 241.6 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

मनूची सातत्यपूर्ण कामगिरी

मनू भाकरने पात्रता फेरीत 583 गुणांसह तिसऱया स्थानावर राहत अंतिम फेरी गाठली होती. कोरियाच्या येजिन ओहने 585 गुणांसह पात्रतेत अव्वल स्थान मिळविले होते, मात्र ती केवळ रँकिंग गुणांसाठी या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यामुळे चीनच्या कियानस्कुन याओ हिने अव्वल मानांकित नेमबाज म्हणून अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानच्या इतर खेळाडूंपैकी ईशा सिंह 577 गुणांसह नवव्या, सुरुची सिंह 574 गुणांसह 12 व्या, पलक 573 गुणांसह 17 व्या आणि सुरभी राव 570 गुणांसह 25 व्या स्थानी राहिल्या. भाकर, सुरुची सिंह आणि पलक या त्रिकुटाने सांघिक स्पर्धेत 1730 गुणांची कमाई करून तिसरे स्थान मिळविले. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत दोन पदके जिंकून हिंदुस्थानचा गौरव वाढविला होता.

हिंदुस्थानची शानदार कामगिरा

या स्पर्धेत हिंदुस्थानने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात आतापर्यंत वैयक्तिक कांस्य, सांघिक रौप्य आणि सांघिक कांस्य अशी पदके पटकाविली आहेत. काल कपिल बैसलाने सुवर्ण मिळविले होते, तर आज रश्मिकाने ‘सुवर्ण’वेध साधला. कपिलने सांघिक रौप्य जिंकले होते, तर रश्मिकाने वंशिका आणि मोहिनीच्या मदतीने सांघिक सुवर्ण जिंकले. ज्युनियर पुरुषांमध्ये जोनाथन गॅविन अॅण्टनीने कांस्य, तर युवा गटात गिरीश गुप्ताने सुवर्ण आणि देव प्रतापने कांस्य जिंकले.

Comments are closed.