चीन दुर्मिळ धातू, खतांचा पुरवठा करण्यास तयार आहे

चीनचे विदेश मंत्री  वांग यी यांच्याकडून आश्वासन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताला दुर्मिळ धातू, खते, युरिया आणि एनपीके तसेच डीएपी पुरविण्याची तयारी चीनने दर्शविली आहे, असे वृत्त सूत्रांनी दिले आहे. चीनने गेल्या काही महिन्यांपासून या पुरवठ्यावर बंधने आणली आहेत. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे भारताच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्या चर्चेत चीनने हे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आहे.

जयशंकर आणि वांग यी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध आणि जागतिक घडामोडी यांच्यावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, सीमावाद आणि इतर संरक्षणविषयक मुद्द्यांवर मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी झाली नाहीत. कारण, या मुद्द्यांवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी वांग यी यांच्याशी चर्चा केली आहे. भारताशी सुरळीत संबंध प्रस्थापित करण्यास चीन उत्सुक असून या संबंधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात अधिक बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या अखेरीस शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीनला जाणार आहेत.

तैवानवरील भूमिकेत परिवर्तन नाही

भारताने आपल्या तैवानविषयीच्या भूमिकेत कोणतेही परिवर्तन केलेले नाही. ज्याप्रमाणे जगातील इतर देश तैवानशी संबंध ठेवून आहेत, त्याचप्रमाणे भारतही तैवानशी राजकीय आणि आर्थिक संबंध ठेवून आहे. भारताने या संबंधी कोणाचीही बाजू घेणे कटाक्षाने टाळले आहे आणि सध्याही भारताची हीच भूमिका आहे, अशी स्पष्टोक्ती एस. जयशंकर यांनी वांग यी यांच्याशी बोलताना केली आहे.

अमेरिकेच्या धोरणांमुळे अनिश्चितता

अमेरिकेने साऱ्या जगावर व्यापार शुल्क लावले आहे. भारतावर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. तर चीनवरही 30 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे साऱ्या जगात आर्थिक उलथापालथ होत असून काही देश अनपेक्षितरित्या एकमेकांच्या जवळ आले आहेत. भारत आणि चीन हे पारंपरिक प्रतिस्पर्धी देश अमेरिकेच्या धोरणामुळे एकमेकांच्या जवळ येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे, असे अनेक राजकीय आणि जागतिक तज्ञांचे मत आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा

वांग यी आणि जयशंकर यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दहशतवादाचा सर्वांनी निषेध करणे आवश्यक आहे कारण दहशतवादाचा धोका सर्व देशांना आहे. त्यामुळे कोणतेही निमित्त न सांगता आणि कोणत्याही कारणास्तव दहशतवादाचे समर्थन न करता त्याचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, ही भारताची भूमिका वांग यी यांच्यासमोर जयशंकर यांनी स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतासाठी महत्वपूर्ण

भारताला खते आणि युरिया तसेच बोगदे खोदणारी यंत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांसाठी उपयुक्त असणारे दुर्मिळ धातू पुरविण्याचे चीनचे आश्वासन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे उद्योगजगतातील तज्ञांचे मत आहे. भारताला या वस्तूंची अत्यंत आवश्यकता आहे. दुर्मिळ खनिजांचे साठे भारतातही आहेत. तथापि, त्यांच्यातून धातूंचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक मोठी गुंतवणूक करण्यास भारताला वेळ लागणार आहे. या खनिजांच्या संदर्भात भारत जोपर्यंत स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत भारताला आयातीवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

Comments are closed.