ब्रेव्हिसच्या वनडे पदार्पणाची निराशाजनक सुरुवात; पण खास यादीत नाव नोंदवलं
मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 92 धावांनी पराभव केला. या सामन्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसने दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले. ब्रेव्हिस त्याच्या एकदिवसीय पदार्पणात काही खास कामगिरी करू शकला नाही आणि फक्त 2 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. त्याने त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यासोबतच त्याच्या नावावर एक खास विक्रमाची भर पडली आहे.
ब्रेव्हिसने त्याच्या एकदिवसीय पदार्पणात फक्त 6 धावा केल्या, परंतु त्या एका षटकारामुळे तो एका खास यादीत सामील झाला, ज्यामध्ये आतापर्यंत फक्त 6 खेळाडूंचे नाव होते. ब्रेव्हिस आता त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी 2008 मध्ये फक्त जोहान लॉने ही कामगिरी केली होती. त्याच वेळी, ब्रेव्हिस जागतिक क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा सातवा फलंदाज बनला आहे. भारताचा फलंदाज इशान किशनचे नावही या यादीत समाविष्ट आहे.
2002 नंतर एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा फलंदाज
जोहान लू (दक्षिण आफ्रिका), 2008
जावद दाऊद (कॅनडा), २०१०
क्रेग वॉलेस (स्कॉटलंड), 2016
रिचर्ड नगारावा (झिम्बाब्वे), 2017
इशान किशन (भारत), 2021
शमीम हुसेन (बांगलादेश), 2023
डेवॉल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका), 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 296 धावा केल्या. संघाचा सलामीवीर एडेन मार्करामने 82 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 9 चौकार निघाले. रायन रिकल्टनने 33 धावा केल्या. कर्णधार टेम्बा बावुमाने 65 आणि मॅथ्यू ब्रीट्झकेने 57 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 40.5 षटकात 198 धावांवर सर्वबाद झाला. संघाचा कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक 88 धावा केल्या परंतु त्याच्याशिवाय उर्वरित फलंदाज या सामन्यात वाईटरित्या अपयशी ठरले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
Comments are closed.