श्रेयस-यशस्वीने अजून काय करायला हवे? माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांना पडला प्रश्न
>> मंगेश वरावडेकर
त्यांची बॅट तळपतेय, फिटनेसही जबरदस्त आहे. जेव्हा बॅटमधून धावांचा पाऊस पडत असतो तेव्हा फलंदाजाला संघात येण्यासाठी काहीही करावे लागत नाही. तरीही खेळाडूंना डावललं जात असेल तर मन विचलित होणारच. आशिया कपसाठी यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर या धडाकेबाज फलंदाजांना संघातून डावलल्यानंतर त्यांनी संघात येण्यासाठी आणखी काय करायला हवे? असा प्रश्न हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू आणि निवड समितीचे अध्यक्षपद यशस्वीपणे हाताळणाऱया दिलीप वेंगसरकर यांना पडलाय.
येत्या 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱया आशिया कपसाठी आज हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली आणि जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघातून यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर या दोन्ही मुंबईकरांची नावे गायब होती. यशस्वी जैसवाल हा तिन्ही क्रिकेटमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा आक्रमक सलामीवीर आहे. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत जैसवालने 411 धावा ठोकल्या होत्या, तर आयपीएलमध्ये 559 धावांचा पाऊस पाडला होता. यशस्वीप्रमाणे श्रेयसलाही आशिया कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता होती, पण त्याच्यावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयसने केवळ 604 धावाच केल्या नव्हत्या तर त्याने पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीही गाठून दिली होती. एवढेच नव्हे तर
वर्षाच्या प्रारंभी झालेल्या चॅम्पियन्स
ट्रॉफीतही श्रेयसने धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडवले होते. त्यामुळे तोसुद्धा आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्याचा दावेदार होता, पण प्रत्यक्षात असे काही घडले नाही.
आज आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा झाल्यानंतर दिलीप वेंगसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संघात यशस्वी-श्रेयस नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. हिंदुस्थानी संघात स्थान मिळवणे आता सोपे राहिले नाहीय. इतकी प्रचंड स्पर्धा वाढलीय की निवड समितीलाही प्रश्न पडतो की, कुणाची निवड करावी आणि कुणाला विश्रांती द्यावी? हिंदुस्थानी संघ निवडताना निवड समितीला तारेवरची कसरत करावी लागते हे मान्य, पण त्यांनी आशिया कपसाठी जैसवाल-अय्यरला डावलले, हा प्रकार मलाही कळलेला नाही. हिंदुस्थानी संघात बसण्यासाठी फॉर्म आणि फिटनेस या दोन गोष्टीच महत्त्वाच्या असतात आणि या दोन्ही गोष्टीत हे दोघे जबरदस्त होते. दोघांनाही आशिया कपसाठी संघात स्थान मिळायलाच हवे होते, असेही दिलीप वेंगसरकर म्हणाले.
जैसवाल-अय्यर बाहेर गेल्यामुळे मुंबईची राष्ट्रीय संघातील ताकद कमी झाल्याचेही चित्र दिसले आहे. आधीच रोहित शर्माने निवृत्ती पत्करलीय, त्यातच हे दोघे नसल्यामुळे आता हिंदुस्थानी संघात केवळ सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे दोघेच मुंबईकर आहेत.
मोठय़ा स्पर्धांमध्ये जैसवालवर अन्याय
2023 च्या प्रारंभी कसोटी क्रिकेटद्वारे हिंदुस्थानी संघात पदार्पण करणाऱया यशस्वी जैसवालने कसोटीसह आयपीएलमध्ये आपला झंझावात गेले अडीच वर्षे कायम ठेवला आहे. मात्र त्याला अद्याप मोठय़ा स्पर्धेत आपले स्थान पक्के करता आलेले नाही. 2023 साली जैसवाल आयसीसी वर्ल्ड कपसाठी संघात बसला नव्हता. मात्र 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याला डावलण्यात आले होते. त्यानंतर वर्षाच्या प्रारंभी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याला हिंदुस्थानी संघापासून दूर ठेवण्यात आले होते. म्हणजेच जबरदस्त फॉर्मात असूनही यशस्वी जैसवाल मोठय़ा स्पर्धात निवडला गेलेला नाही. हा त्याच्यावर प्रतिभेवर होणारा अन्यायच असल्याची भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.