साड्या कपाटात ठेवताना करु नयेत या चुका
स्त्रीचं रूप खुलवणारे वस्त्र म्हणजे साडी. साडी हा महिलांचा सॉफ्ट कॉर्नर असतो. कारण ऑफिस असो वा कोणतेही फंक्शन महिलांची पहिली पसंती ही साडीला असते. दररोज फॅशनमध्ये विविध ट्रेंड येत असले तरी साडीची फॅशन आऊटडेटेड झालेली नाही. त्यामुळे महिलांकडे सिल्क, खादी, कॉटन, नेटेड, डिझायनर अशा विविध प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात. खास प्रसंगी नेसून झाल्यावर या साड्या पुन्हा कपाटात ठेवण्यात येतात. पण, अनेकदा या साड्यांवर आपण बुरशी जमा झालेली पाहतो तर काही वेळा साड्या विरळ होतात. यासाठी साड्या कपाटात ठेवताना काही चुका करणे टाळायला हव्यात, जेणेकरून साड्या खराब होणार नाहीत.
व्यवस्थित घडी न घालणे –
साड्यांची घडी व्यवस्थित न घातल्याने त्या चुरगळल्यासारख्या दिसू शकतात. त्यामुळे कितीही घाई असली तरीही साडीची घडी व्यवस्थित करून त्यानंतरच कपाटात ठेवावी.
नेप्थॉलिनच्या गोळ्या साड्यांमध्ये ठेवणे –
अनेकजणींना अशी सवय असते की, नेप्थॉलिनच्या गोळ्या साड्यांमध्ये ठेवतात. पण, यामुळे साड्यांचे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही लवंग किंवा कापूर ठेवू शकता.
इतर कपड्यांसोबत ठेवणे –
सिल्क किंवा इतर कापडाच्या कपड्यांसोबत साड्या ठेवल्यास त्या विरळ, खराब होऊ शकतात. साड्या महागड्या असतील तर तुम्ही त्या मऊ कापडात गुंडाळून ठेवू शकता.
प्लास्टिक पिशवीत ठेवणे –
साड्या चांगल्या राहाव्यात यासाठी त्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या जातात. पण, यामुळे साड्यांचा रंग फिका होऊ शकतो. प्लास्टिकऐवजी कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता.
ओलसर ठिकाणी ठेवणे –
साड्या कपाटात ओलसर ठिकाणी ठेवू नये, यामुळे बुरशी येऊ शकते.
साडीची घडी न बदलल्यास –
साड्या बऱ्याच काळ एकाच पद्धतीत ठेवल्यास घडांच्या जागचे कापड विरळ होत जाते. ज्यामुळे साडी फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे साड्यांची दोन ते तीन महिन्यांनी घडी बदलावी.
नियमित उन्हात न घालणे –
साड्यांना अधूनमधून ऊन दाखवणे गरजेचे असते. ज्यामुळे कपड्यातील ओलावा कमी होतो आणि बुरशी वाढत नाही.
खूप जास्त साड्या एकाच ठिकाणी ठेवणे –
खूप जास्त साड्या एकाच ठिकाणी चुकूनही ठेवू नये. डिझायनर साड्यांच्या बाबतीत तर ही चूक करूच नये. यामुळे साड्यांवरील नक्षीकाम खराब होऊ शकते.
हेही वाचा – Bra म्हणजे नक्की काय? फुलफॉर्म जाणून तुम्हीही थक्क व्हाल
Comments are closed.