नीरजची उद्या ब्रसेल्समध्ये भालाफेक नाही

डायमंड लीग फायनल्समध्ये आपली जागा आधीच पक्की झाल्यामुळे बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये शुक्रवारी होणार्या अखेरच्या टप्प्यात स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा उतरणार नाही. या सत्रात 14 स्पर्धांपैकी फक्त चार ठिकाणीच भालाफेक झाली होती आणि नीरजने त्यापैकी फक्त दोनमध्ये भाग घेतला. तरीही तो स्वित्झर्लंडच्या झ्युरिकमध्ये 28 ऑगस्ट रोजी होणार्या डायमंड लीग फाइनल्समध्ये धडकला आहे. मे महिन्यात दोहा येथे 90.23 मीटरचा टप्पा पार करूनही जर्मनीच्या जुलियन वेबरनंतर दुसर्या क्रमांकावर थांबलेल्या नीरजने जूनमध्ये पॅरिसमध्ये 88.16 मीटरसह विजेतेपद पटकावले. यापूर्वी पाच जुलैला बंगळुरूमध्ये झालेल्या एनसी क्लासिकमध्ये 86.18 मीटरचा फेक मारून तो घरच्या मैदानावरही अजिंक्य ठरला होता. या हंगामात नीरजने एकूण सहा स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यापैकी चार जिंकल्या आणि दोनमध्ये उपविजेता झाला. आता त्याचे लक्ष्य आहे 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान टोकियोत होणार्या विश्वचषकात आपले जेतेपद राखणे.

Comments are closed.