40 मजली उंच रॉकेट तयार करण्यासाठी इस्रो

75 हजार किलो वजन अंतराळात वाहून नेण्याची क्षमता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी नुकतीच एक मोठी घोषणा करत अंतराळ संस्था एका मोठ्या रॉकेटच्या निर्मितीवर काम करत असल्याचे जाहीर केले. या रॉकेटची उंची 40 मजली इमारतीइतकी असून ते पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 75,000 किलो (75 टन) वजनाचा ‘पेलोड’ वाहून नेऊ शकेल. या रॉकेटच्या माध्यमातून लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीपासून 600-900 किमी उंचीवर असलेल्या कक्षेत संप्रेषण-निरीक्षण उपग्रह पाठवता येणार आहेत.

इस्रो अध्यक्षांनी नव्या रॉकेटची तुलना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी बनवलेल्या भारताच्या पहिल्या रॉकेटशी करताना अंतराळ संशोधनातील भारताची वाढती ताकदही स्पष्ट केली. 75 टन वजनाचा पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेणे ही एक मोठी कामगिरी आहे. या रॉकेटमध्ये इस्रोच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला असून तो भारताच्या स्वावलंबनाचे प्रतीक असल्याचे सांगितले.

अमेरिकेचा 6,500 किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करणे हे अंतराळात भारताची वाढती विश्वासार्हता दर्शवते. हे रॉकेट लष्करी संप्रेषण, पृथ्वी निरीक्षण आणि नेव्हिगेशन यासारख्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवेल. इस्रो आधीच नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (एनजीएलव्ही) वर काम करत असून त्यामध्ये पहिला टप्पा पुन्हा वापरता येईल. हे नवीन रॉकेट देखील या दिशेने एक पाऊल असू शकते.

Comments are closed.