पाकिस्तानी तस्कर जैसलमेरमध्ये अटक
मिलिट्री इंटेलिजेन्सकडुन कारवाई
वृत्तसंस्था/ जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेर येथे मिलिट्री इंटेलिजेन्सने एका 30 वर्षीय इसमाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या इसमाचे नाव जिवन खान असून तो जैसलमेरच्या सांकडा येथील रहिवासी आहे. खान हा पूर्वी सैन्याच्या भागातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता आणि आता तो पुन्हा सैन्यक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत होता. खानला सैन्यक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले, जेथे त्याचा मोबाइल तपासला असता संशय बळावला. मिलिट्री इंटेलिजेन्सने त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. चौकशीत खानने पाकिस्तानशी संबंध असल्याचे मान्य केले आहे.
यापूर्वी डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये काम करणाऱ्या एका कंत्राटी व्यवस्थापकाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या आरोपीचे नाव महेंद्र प्रसाद होते आणि तो उत्तराखंडच्या अल्मोडाचा रहिवासी होता. महेंद्र प्रसाद हा सोशल मीडियाद्वारे आयएसआयच्या संपर्कात होता आणि डीआरडीओचे वैज्ञानिक आणि सैन्याधिकाऱ्यांच्या हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होता.
Comments are closed.