राधाकृष्णन उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करतात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतिपदासाठीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. राधाकृष्णन यांनी राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यांचा अर्ज आणि कागदपत्रांचे चार संच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या महासचिवांच्या हाती दिले. राज्यसभेचे महासचिव हे या निवडणुकीचे मुख्य अधिकारी असतात. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक घेतली जाते.

पंतप्रधान मोदी प्रस्तावक

सी. पी. राधाकृष्णन यांच्या उमेवारी अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यांच्याप्रमाणेच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंग यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्यसभा महासचिव पी. सी. मोदी यांनी नंतर अर्ज आणि त्यासह जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर, राधाकृष्णन यांनी या नोंदपुस्तकात स्वाक्षरी केली. महासचिवांनी पावती पत्रिका (अॅकनॉलेजमेंट रिसीट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली. अशा प्रकारे सी. पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रे•ाr हे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत.

इतर अनेक मान्यवर उपस्थित

ज्येष्ठ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री आणि तेलगु देशमचे नेते के. राममोहन नायडू, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, लोकजनशक्ती नेते चिराग पासवान आणि इतर मान्यवरांनी उमेदवारी अर्ज सादर करताना राधाकृष्णन यांची पाठराखण केली. अर्ज सादर करण्यापूर्वी राधाकृष्णन यांनी ‘प्रेरणा स्थळ’ येथे जाऊन मान्यवरांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले.

विजय जवळपास निश्चित

उपराष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन सदनांचे विद्यमान खासदार मतदार असतात. या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत आहे. लोकसभेत या आघाडीकडे 542 पैकी 294 खासदार आहेत. तर राज्यसभेत 245 पैकी 134 आहेत. याखेरीज त्यांना दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेल्या काही पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेस पक्षानेही समर्थन घोषित केले आहे.

Comments are closed.