विद्यार्थ्याने दहाव्या ग्रेडरला ठार मारले

अहमदाबाद येथील धक्कादायक घटना : शाळेत संतप्त जमावाकडून तोडफोड

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबादमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संतप्त मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत तोडफोड केली आहे. या विद्यार्थ्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला होता, ज्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. ही घटना अहमदाबादच्या खोखरा येथील खासगी शाळेत घडली आहे. 10 वीचा विद्यार्थी नयनवर मंगळवारी नववीतील एका विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला होता. नयनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय संतप्त झाले आहेत.

मृत विद्याथीं सिंधी समुदायाशी संबंधित आहे, तर अल्पवयीन आरोपी विशिष्ट समुदायाचा असल्याने सांप्रदायिक तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने बुधवारी शाळेत मोठ्या प्रमाणात तोडफोड करत मालमत्तेची नासधूस केली आहे. तसेच बसेसवर दगडफेक केली. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.

सिंधी समुदायाचे लोक बुधवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येत शाळा परिसरात दाखल झाले. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे संतप्त पालक, हिंदुत्ववादी संघटना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शाळेला लक्ष्य केले. तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. तर जमावाचा आक्रोश पाहता शाळेत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी नयनवर हल्ला करणाऱ्या 9 वीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. जुवेनाइल कायद्यानुसार पोलिसांकडुन याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. पालकांनी आरोपी विद्यार्थ्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रार नोंद करण्याची मागणी केली आहे.

आरोपी विद्यार्थ्याचे संबंधित विद्यार्थ्यासोबत मांसाहारावरुन भांडण झाले होते अशी माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्याला यश मिळाले नव्हते. जमावाने स्कूल बस, कार आणि आसपास उभ्या दुचाकींची तोडफोड केली आहे.

Comments are closed.