अग्नि -5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
5 हजार किमीपर्यंत मारक क्षमता : पाकिस्तान-चीन आता पूर्णपणे टप्प्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली,
भारताने बुधवारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5 ची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे भारताची सामरिक आणि संरक्षण क्षमता बळकट झाली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता (रेंज) 5,000 किलोमीटरपेक्षाही अधिक असल्यामुळे ती भारताच्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक बनली आहे. तसेच आता पाकिस्तान, चीनसारखे अनेक देश या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये आले आहेत. या चाचणीच्या माध्यमातून अग्नि-5 क्षेपणास्त्राने सध्याच्या चाचणीत सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष पूर्ण केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे.
अग्नि-5 क्षेपणास्त्रातील बरेच भाग स्वदेशी आहेत. या क्षेपणास्त्राची रेंज 5,000 किमी पर्यंत आहे. याचा अर्थ आता चीन किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही भागावर भारत हल्ला करू शकतो. बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीत त्याची चाचणी घेण्यात आली. अग्नि-5 ची रेंज 5,000 किमी आहे. ते मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याचा अर्थ ते एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर डागता येते.
पाच हजार किमीपर्यंतची मारक क्षमता ही अग्नि-5 ची सर्वात मोठी ताकद मानली जाते. साहजिकच आता बीजिंग, शांघाय, ग्वांगझू ते इस्लामाबाद आणि कराचीपर्यंतची अनेक शहरे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या कक्षेत आली आहेत. तसेच भारत केवळ आशियाच नाही तर युरोप आणि आफ्रिकेचा मोठा भाग देखील व्यापू शकतो.
रडारलाही देणार चकवा
अग्नि-5 हे क्षेपणास्त्र अशाप्रकारे डिझाईन केले आहे की ते शत्रूच्या कोणत्याही क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालीला फसवू शकते. वेग आणि उंची बदलण्याची त्याची क्षमता तसेच प्रगत नेव्हिगेशन प्रणालीमुळे ते जवळजवळ रडारच्या आवाक्याबाहेर जाते. अग्नि-5 हे भारतातील सर्वात शक्तिशाली मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे.
डीआरडीओकडून निर्मिती
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) अग्नि-5 क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. त्याच्या यापूर्वीही अनेक चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी एप्रिल 2012 मध्ये करण्यात आली होती. तसेच यापूर्वी 11 मार्च 2024 रोजी याच चाचणी श्रेणीतून अग्नि-5 ची अखेरची चाचणी झाली होती. आताच्या चाचणीत या क्षेपणास्त्राने 5,000 किमी पेक्षा जास्त अंतर पार करताना कमाल 600 किमी उंची गाठली.
Comments are closed.