पावसाचा ब्रेक! ठाणे, पालघर, रायगडातील पूर ओसरतोय; आता साईड इफेक्ट, वीज गायब, घरांमध्ये चिखल, रोगराईची भीती
गेल्या दोन दिवसांपासून आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने आज अखेर ‘ब्रेक’ घेतला. ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर आता ओसरू लागला आहे. मात्र या पावसाने लाखो नागरिकांची झोप उडवली असून त्याचे साईड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत. अनेक गावांमधील वीज गायब झाल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत, तर घरांमध्ये चिखल झाला असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रातही धूर व औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
७० गावांचा संपर्क तुटला
उल्हास नदीला पूर आल्याने रायता पूल पाण्याखाली गेला असून ६० ते ७० गावांचा संपर्क तुटला आहे. पहाटे तीनच्या सुमारास पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे व्यापारी, दूध विक्रेते, शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांचे नुकसान झाले आहे.
३० कामगारांना वाचवले
रायते येथील जुन्या मळ्यामध्ये ३० ते ३५ कामगार अडकले होते. त्यांना पोकलेनच्या सहाय्याने ग्रामस्थांनी वाचवले. एनडीआरएफच्या टीमनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली, केडिया फार्महाऊसमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नऊ गाई व सात वासरे यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
मोखाड्यात दरड कोसळली
मोखाडा तालुक्यातील कारेगाव-करोळ रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असून गारगाई नदीच्या पुलावर पाणी आले आहे, तर वेलपाडा-मरकटवाडी रस्त्यावर भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. करोळ, पाचघर आणि बावळ्याची वाडी येथील ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इश्वरा देण्यात आला आहे. तानसा धरणाचेदेखील काही दरवाजे उघडल्याने सावरोळी येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, तर गोठेघर येथील कातकरीवाडीत अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
पूरग्रस्तांच्या नाश्त्यामध्ये किडे
पनवेलमधील पूरग्रस्तांना सेक्टर १ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थलांतरित केले आहे. महापालिकेच्या वतीने त्यांना नाश्ता देण्यात आला, पण त्यात किडे आढळून आल्याने नागरिक संतप्त झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाऊस अपडेट
- जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली.
- शहापूर तालुक्यातील भातसा, कानबा, मुमरी या सर्व नद्या दुधडी भरून बाहत आहेत. पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन टीम आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
- भातसई येथील अरुंद, बिना कठडधाचा, जुना धोकादायक पूल पाण्याखाली बुडाला आहे. त्यामुळे बासिंद व परिसरातील ४२ गावांचा संपर्क तुटला.
- भातसानगर येथील ग्रामस्थ राजेश निचिते यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून संसार उघड्यावर पडला आहे.
- डहाणू तालुक्याच्या सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणाचे दरवाजे उघडले असून ८ हजार ४७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावध राहण्यास सांगितले आहे.
- मुंबई-पुणे मार्गावरील बोरघाटात आजपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
Comments are closed.