भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी,
भिवंडी: भिवंडीतील खर्डी येथे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांच्या सहकऱ्याची कार्यालयाबाहेर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना पोलिसांनी अटक केली असून विकी म्हात्रे हे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे जवळचे मानले जातात. कुटुंबीयांनी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली असून खासदार सुरेश म्हात्रे व त्यांचा पुत्र सुमित म्हात्रे यांच्या मोबाईल सीडीआरची तपासणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. ही केस फास्टट्रॅकवर चालवावी तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आला आहे.
कार्यालयाबाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
भिवंडी शहरातील खर्डी परिसरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली होती. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी यांची कार्यालयाबाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. व्यवसायिक कारणावरून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना अटक केली आहे. विकी म्हात्रे हे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय हल्ल्याप्रकरणी अजून दोन ते तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे या हल्ल्यामध्ये जखमी असलेला धीरज तांगडी याची देखील चौकशी सुरू आहे.
वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते…
या प्रकरणात याआधीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. प्रफुल्ल तांगडी मुलाचा वाढदिवस असल्याने ताज हॉटेलमध्ये त्यांनी सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते तेथून ते घरी परतल्यानंतर त्यांना ऑफिसला कोणी बोलावले व तिथे त्यांना जास्त वेळ कोणी थांबवून ठेवलं होतं त्यांना देखील अटक करावे अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे तर कुटुंबीयांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. शिवाय, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि त्यांचा पुत्र सुमित म्हात्रे यांच्या मोबाईल सीडीआर तपासण्यासाठी पोलिसांना अधिकृत पत्र दिले आहे. कुटुंबीयांचा ठाम आग्रह आहे की ही केस फास्टट्रॅकवर चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भिवंडी तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.