वसईतील पेट्रोल पंपावर ‘गोलमाल है भाई’, भेसळयुक्त पेट्रोल विक्रीची पोलखोल

वसईच्या सागरशेत येथील पेट्रोल पंपावर ‘गोलमाल’ सुरू असून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भेसळयुक्त पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची पाहणी करत भेसळयुक्त पेट्रोल विक्रीची पोलखोल केली.

सागरशेत पेट्रोल पंपावर गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींमध्ये भेसळयुक्त पेट्रोल वापरल्याने वाहनचालकांच्या गाड्या नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच आर्थिक भुर्दंडही सहन करावा ल ागत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. या घटनेची गांभीर्याने दखल पुरवठा विभागाने पेट्रोल पंपाला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी पेट्रोलची तपासणी केली असता त्यात भेसळ असल्याचे उघड झाले.

पेट्रोलचे नमुने गोळा केले

प्राथमिक तपासणीत पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे उघड होताच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलचे नमुने गोळा करून पुढील तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करणारा पेट्रोलपंप सील करण्यात आला असल्याची माहिती वसई पुरवठा विभागाचे अधिकारी भागवत सोनार यांनी दिली.

Comments are closed.