अज्ञात दरोडेखोरांचा एटीएमवर डल्ला, पोलीस मात्र साखर झोपेत

देवळाली प्रवरानगर पालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे व चोऱ्यांचे सत्र वाढत चालले आहे. मात्र तरी पोलिसांनी अद्यापही गस्त सुरु केलेली नाही. अशातच पोलीस नेहमीप्रमाणे साखर झोपेत असताना काही अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडले. आणि त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे.एटीएमवर दरोडा घालण्याची घटना घडल्यानंतरही देवळाली प्रवराची चौकी बंदच होती. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत राहुरी फॅक्टरी सह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून आठ दिवसापूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली होती. तर मागील दोन दिवसापूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान बुधवारी सकाळी देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही.

देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलीस चौकी आहे.परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस उपस्थित नसतो. पोलीस स्वतःच्या घरी साखर झोपेत असताना एसबीआय बँकेचे एटीएमवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडा टाकणारे अज्ञात चोर सीसीटिव्हीमध्ये कैद झाले.दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या बोलोरो गाडीतून आले होते. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे.

Comments are closed.