किणी टोलनाक्यावर 77 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 62 लाखांच्या गुटख्यासह तस्करी करणारा टेम्पो, असा 77 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची कारवाई जयसिंगपूर व वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी केली.
गडहिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून गुटखा भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याचे समजले. त्यांनी जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार जयसिंगपूर विभागीय पोलिसांचे पथक व वडगाव ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे, अनिल अष्टेकर यांच्या पथकाने किणी पथकर नाक्याजवळ सापळा लावला.
मंगळवारी दुपारी संशयित टेम्पो नाक्याजवळ आला असता, तो रोखण्यात आला. चालकास गाडीत काय, असे विचारले असता, त्याने दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र, कुलूप काढून पाहिले असता, त्यात पानमसाला व सुगंधी तंबाखूची पोती भरलेली आढळली. चालक शहजाद महंमद मुबीनखान (वय 40, रा. हुसेनाबाद, ता. जि. सुलजयपूर उत्तर प्रदेश, सध्या रा. बैंगणवाडी, शिवाजीनगर, मुंबई) व त्याचा साथीदार रिजवान अहमदखान ऊर्फ रजा (वय 32, रा. कोटीया, ता. कुरवार, जि. सुलतानपूर उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पो वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. यामध्ये प्रतिबंधित विमल केसरयुक्त पान मसाल्याची 156 पोती आढळून आली. या 62 लाख 45 हजार 360 रुपये किमतीच्या पान मसाल्यासह 15 लाख रुपये किमतीचा कंटेनर, असा 77 लाख 45 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Comments are closed.