आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा, महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती; अर्भकाचा मृत्यू

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातच आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकतर गगनबावडा तालुक्यातील रुग्णालयात अपुऱ्या सुविधा त्यात मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने, सात महिन्यांच्या गर्भवतीची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. यात आई वाचली असली, तरी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीतही प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय 33) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने, गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने, त्यांना तातडीने कोल्हापूर शहरात सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना कोल्हापूरकडे घेऊन जात असताना मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद असल्याने ही रुग्णवाहिका खोकुर्ले येथे अडकून पडली. त्यामुळे रुग्णवाहिकेतच या गर्भवतीची प्रसूती झाली. यात दुर्दैवाने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. यानंतर निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 180 रुग्णवाहिकेचे डॉ. स्वप्नील तमखाने व चालक सतीश कांबळे यांनी जीव धोक्यात घालून, कल्पना यांना पुराच्या पाण्यातून, स्ट्रेचरवरून किरवे येथील पुराचे पाणी पार करून नेले. कळे आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Comments are closed.