भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही, केंद्राचा मोठा निर्णय!

एशिया कप 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan Asia Cup) यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असं म्हटलं आहे. जर केवळ दोनच देशांमध्ये क्रिकेट सामन्यांची स्पर्धा असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोधच असता असंही केंद्राने म्हटलं आहे. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले. त्याशिवाय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेत आशियातील अनेक देश सहभागी होत असल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आशिया चषक T20 स्पर्धेला येत्या 9 सप्टेंबर दुबईत सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 10 तारखेला यूएईविरुद्ध तर दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळवला जाणार आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी भारताचं धोरण काय आहे, नियम काय आहेत याचा दाखला देताना, भारतीय संघ पाकिस्तानात किंवा पाकिस्तान संघ भारतात खेळू शकणार नाही, हे अधोरेखित केलं. आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांसाठी दोन्ही देशातील खेळाडू सहभागी होऊ शकतात.  मात्र भारताने आपल्या खेळाडूंची सुरक्षा नेहमी लक्षात घेऊन पाकिस्तानात न जाता, त्रयस्थ ठिकाणी सामने खेळले.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानबाबत भारताची अधिकृत भूमिका

द्विपक्षीय क्रीडा सामने : भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाहीत तसेच पाकिस्तानी संघांनाही भारतात खेळण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.

आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय स्पर्धा : अशा स्पर्धांमध्ये सहभागाचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या प्रथेप्रमाणे आणि भारतीय खेळाडूंचं हित लक्षात घेऊन घेतला जाईल.

आयोजक म्हणून भारत : आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत एक विश्वासार्ह ठिकाण म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे भारतीय संघ आणि खेळाडू अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील जिथे पाकिस्तानचे संघ अथवा खेळाडू देखील सहभागी असतील. त्याचप्रमाणे भारत जेव्हा बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करेल, तेव्हा पाकिस्तानी खेळाडू आणि संघांनाही सहभाग घेता येईल.

व्हिसा प्रक्रिया सुलभ : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडू, संघाचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांच्यासाठी व्हिसा प्रक्रिया सोपी केली जाईल.

मल्टी-एंट्री व्हिसा : आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी, जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत, मल्टी-एंट्री व्हिसा प्राधान्याने दिला जाईल. त्यामुळे त्यांचा भारतात ये-जा करणे अधिक सुलभ होईल.

शिष्टाचार आणि प्रोटोकॉल : आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या प्रमुखांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आवश्यक त्या शिष्टाचार आणि प्रोटोकॉलनुसार आदर दिला जाईल.

भारतीय संघाची घोषणा

दरम्यान, आशिया चषकासाठी दोनच दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात 15 जणांची टीम दुबईला रवाना होत आहे. भारत हा आशिया चषकाचा आयोजक आहे, मात्र हे आयोजन UAE मध्ये करण्यात आलं आहे.

भारत आणि पाकिस्तान 3 सामने?

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. पहिला सामना 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. लीग स्टेजनंतर सुपर 4 राऊंड होईल. जर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहोचले तर 21 सप्टेंबरला पुन्हा भारत-पाक सामना होऊ शकतो. त्यानंतर जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर  28 सप्टेंबरला तिसऱ्यांदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो.

आशिया चषकासाठी भारतीय संघ (Asia Cup Team India)

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक (Asia Cup time table India)

10 सप्टेंबर – विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर – विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर – विरुद्ध ओमान (अबू धाबी)

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

संबंधित बातम्या

Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad: जिथे संधी मिळाली, तिथे अव्वल दिलं, आता त्याने काय करावं, मग BCCI निवड करेल? श्रेयस अय्यरच्या वडिलांनी हतबलतेने हात टेकले!

आणखी वाचा

Comments are closed.