Mumbai News – अंगात भूत आहे सांगत महिलेला पूजेच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार, मांत्रिकावर गुन्हा दाखल

अंगात भूत आहे ते बाहेर काढतो सांगत महिलेला पूजेला बोलावून मांत्रिकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल राशिद असे आरोपी मांत्रिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कौटुंबिक त्रास तसेच आरोग्याच्या समस्यांनीही त्रस्त होती. कौटुंबिक आणि आरोग्याच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी महिला मांत्रिक राशिदकडे गेली होती. राशिदने तिला तिच्या अंगात भूत असल्याचे सांगितले. तसेच अंगातील भूत काढायचे असल्यास पूजा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मांत्रिकाने महिलेला पूजेसाठी बोलावले.

राशिदने पूजेचा विधी सुरू असतानाच महिलेवर बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. सांताक्रुझ पोलिसांनी मांत्रिकाविरोधात बीएनएसमधील कलम 64, 64(2) आणि महाराष्ट्र निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मांत्रिक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Comments are closed.