आशिया कप 2025 मध्ये दुर्लक्षित! आता या देशासाठी खेळणार मोहम्मद रिझवान

आशिया कप 2025 साठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पण या संघात मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांना संधी देण्यात आलेली नाही. दोन्ही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. आता मोहम्मद रिजवान वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 मध्ये खेळणार आहेत. त्यांना उर्वरित सामन्यांसाठी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघात समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे अधिकृत घोषणापत्र अजून आलेले नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत या निर्णयाची अधिकृत घोषणा होईल. रिजवान, फजलहक फारुकीची जागा घेणार आहेत, जे यूएईमध्ये होणाऱ्या त्रिकोणी मालिकेपूर्वी अफगाणिस्तान संघासोबत सहभागी होणार आहेत. मोहम्मद रिजवान पहिल्यांदाच सीपीएल मध्ये भाग घेणार आहेत. दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स असा सामना रंगणार आहे. रिजवान हा सामना खेळतो का नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आशिया कप 2025 साठी बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना संघातून वगळले आहे. तर 17 सदस्यीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सलमान आगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रश्न निर्माण होतो की, बाबर आणि रिजवान यांचा टी20 करिअर संपला आहे का?

बाबर आणि रिजवान हे अलीकडील टी20 मालिकामध्येही संघाचा भाग नव्हते. त्यामुळे मोठ्या स्पर्धेतून त्यांची हकालपट्टी हे सूचक आहे की पाकिस्तान पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाला लक्षात घेऊन नव्या धोरणावर काम करत आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या मागील हंगामात बाबरने पेशावर झल्मीकरिता 288 धावा केल्या, त्याचा स्ट्राइक रेट 128.57 होता. तर रिजवानने मुल्तान सुल्तान्ससाठी 367 धावा केल्या, त्याचा स्ट्राइक रेट 139.54 होता आणि त्याने एक शतकही झळकावले. दोघांनी शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2024 मध्ये खेळला होता.

Comments are closed.