आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान किती वेळा भिडणार? जाणून घ्या तारखेसहीत सर्व माहिती
आशिया कपची (Asia Cup) सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. भारतानेही आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पण या वेळी सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतरचा हा पहिलाच क्रिकेट सामना असणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर तब्बल तीन वेळा येऊ शकतात.
टीम इंडिया आशिया कपमधील आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध खेळेल. तर पाकिस्तानचा पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होईल. मात्र त्यानंतर 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील, कारण या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मैदानात आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर होईल आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
आशिया कपसाठी संघांना दोन गटांत विभागले गेले आहे. ग्रुप अ मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई आहेत. तर ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग (चीन) आहेत. या दोन्ही गटांमधून प्रत्येकी 2 संघ सुपर-4 मध्ये पोहोचतील. जर ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ क्वालिफाय झाले, तर सुपर-4 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्यात सामना होऊ शकतो. हा सामना दुबई किंवा अबूधाबी येथे खेळला जाईल आणि तोही भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
Comments are closed.