यूएस पॉलिसीवर कोडे
जयशंकर यांची रशियात प्रतिक्रिया, भारत रशियन तेलाचा सर्वात मोठा ग्राहक नसल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/मॉस्को
अमेरिकेने भारताच्या विरोधात 50 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. भारत रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची आयात करीत असल्याने भारताच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेचे हे धोरण कोड्यात टाकणारे आहे. कारण भारत रशियाच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक नाही. अमेरिकेची ही दुहेरी निती अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांनी रशियात केले आहे. जयशंकर यांनी गुरुवारी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आदी मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या धोरणासंबंधी भाष्य केले.
अमेरिकेनेच भारताला रशियाकडून तेल विकत घेण्याचा सल्ला दिला होता. भारताने रशियाकडून तेल घेतल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी राहतील. त्यामुळे जगाच्या ऊर्जा बाजारात स्थैर्य निर्माण होईल, असे अमेरिकेचे म्हणणे होते. भारताने ते मानून रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या खरेदीत वाढ केली आहे. आता अमेरिकेने अचानकपणे आपले धोरण परिवर्तित करून दुहेरी नितीचा अवलंब केला आहे. भारतापेक्षा चीन रशियाच्या तेलाची खरेदी अधिक प्रमाणात करतो. तसेच, रशियाच्या इंधन वायूची खरेदी युरोपियन देश सर्वात अधिक प्रमाणात करतात. पण अमेरिकेने त्यांच्यावर असे कर लावलेले नाहीत. भारताला मात्र लक्ष्य बनविण्यात येत आहे, अशी टीका जयशंकर यांनी अमेरिकेच्या धोरणावर बोलताना केली.
भारत-रशिया संबंध अधिक बळकट
भारत आणि रशिया हे देश आता अधिक जवळ आले आहेत. जगात कोणत्याही दोन देशांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील संबंध सर्वात जास्त काळ स्थिर आहेत. दोन्ही देश आता व्यापार आणि तंत्रज्ञान या दोन क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशांची संरक्षण क्षेत्रातील भागिदारीही वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी व्यक्त केली.
भारतीय नागरिकांचा प्रश्न
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात काही भारतीय रशियाच्या बाजूने सैन्यात आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित करावी, अशी मागणी जयशंकर यांनी रशियाकडे केली. अशा अनेक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय युवक रशियाकडून युद्धात आहेत. त्यांचीही सुटका लवकरात लवकर करण्यात यावी, असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
रशियाला निर्यात वाढविणार
भारत आणि रशिया यांच्यात समतोल आणि वर्धिष्णू व्यापारी संबंध प्रस्थापित केले जाणार आहेत. रशियाला आपली निर्यात वाढविण्यासाठी भारत पावले उचलत आहे. दोन्ही देशांच्या व्यापारात निर्माण होणाऱ्या बिगर कर समस्यांवर तोडगा काढला जाणार असून दोन्ही देश एकमेकांना सुलभपणे निर्यात करु शकतील, अशी व्यवस्था त्वरित निर्माण केली जाईल, असे दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे.
निक्की हेली यांचीही टीका
भारतावर 50 टक्के कर लागू करण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण पक्षपाती आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे. भारताचा विकास झाला, तर तो ‘आधुनिक जगा’साठी अपायकारक ठरणार नाही. कारण भारत हा चीनसारखा देश नाही. भारताला अमेरिकेच्या जवळ आणण्यासाठी 25 वर्षे करण्यात आलेले प्रयत्न ट्रम्प यांच्या धोरणामुळे निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. ही स्थिती अमेरिकेसाठी आणि जगासाठीही योग्य नाही, अशी स्पष्टोक्तीही निक्की हेली यांनी बुधवारी अमेरिकेत केली आहे.
विशेष द्विपक्षीय भागिदारीला मान्यता
भारताने रशियासमवेतच्या विशेष द्विपक्षीय भागिदारीला मान्यता दिली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी तीन दिवसांच्या आपल्या रशिया दौऱ्यात रशियाच्या विविध महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारवृद्धी आणि संरक्षण सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. भारत रशियाकडून होणारी तेलखरेदी यापुढेही करत राहणार आहे.
भारत आणि रशिया अधिक नजीक
- अमेरिकेच्या धोरणामुळे भारत व रशिया यांच्यात अधिक सहकार्य
- रशियाकडून होणारी तेलखरेदी भारताच्या जनतेसाठी अतिमहत्त्वाची
- भारत-रशिया यांच्यात संरक्षण सहकार्यही अधिक वाढीला लागणार
Comments are closed.