Ganpati Decoration Ideas: गणरायाच्या आगमनापूर्वी घरात करा आकर्षक सजावट

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त प्रत्येकाला चिंता असते ती डेकोरेशनची. यंदा गणेशोत्सवाला घरात सजावट कशी करायची हा प्रश्न असतो. अशा वेळी काही सोप्या टिप्सने तुम्ही घर सजवू शकता. यामुळे घरात प्रसन्न वाटेल आणि घराला शोभाही येईल. यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी घरात कशी सजावट करावी हे आपण पाहूया…

तोरण

बाप्पाच्या आगमनापूर्वी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सजवणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही दारावर फुले आणि पानांपासून बनवलेले तोरण लावू शकता. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाजारात मिळणारे वेगवगेळ्या प्रकारचे मोतीचे तोरण लावू शकता. तोरणांमध्ये बाजारात भरपूर व्हरायटी उपलब्ध असते.

रांगोळी

कोणत्याही शुभ करण्यापूर्वी किंवा सणाला दारापुढे रांगोळी काढणे शुभ मानले जाते. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार छान दिसते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तुम्ही विविध रांगोळीचे डिझाईन काढू शकता. आजकाल इंटरनेटवर सोप्या पद्धतीने रांगोळी काढण्यासाठी व्हिडिओ, माहिती असते. याशिवाय तुम्ही फुलांची रांगोळी देखील बनवू शकता.

माळा

बाप्पाच्या आगमनापूर्वी फुलांच्या माळांचे डेकोरेशन एक उत्तम पर्याय आहे. ताज्या फुलांची सजावट शक्य नसल्यास तुम्ही आर्टिफिशियल फुलांच्या माळा वापरू शकता. बाजारात तुम्हाला यामध्ये असंख्य व्हरायटी पाहायला मिळेल. खिडकीच्या शेजारी बँकड्रॉप म्हणून रंगीबेरंगी, फुलांच्या माळा लावा.

लाईट

ज्या ठिकाणी तुम्ही बाप्पा बसवणार आहात त्याठिकाणी लाईट लावा. लाईटची माळ लावल्यास डेकोरेशनमध्ये भर पडेल. याशिवाय तुमच्या देवघराभोवती देखील तुम्ही डेकोरेशनचे लाईट लावू शकता.

मखर

बाप्पाच्या आगमनापूर्वी तुम्ही आकर्षक असे मखर तयार करू शकता. आजकाल बाजारात तुम्हाला हवी ती व्हरायटी उपलब्ध आहे. याशिवाय शक्य असल्यास तुम्ही घरच्या घरी मखर तयार करू शकता. मखर नको असल्यास विविध ओढण्या, साड्यांपासून बॅकड्रॉप डेकोरेशन आणि त्यावर लाइटिंग करता येते.

Comments are closed.