ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळण्यासाठी परिवहन मंत्र
सेंट कर्मचारी: दर महिन्याला उशिरा पगार मिळवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांना यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच वेतन मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील लाखो एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पगार लवकर देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
राज्य शासनाचे कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी पगार देण्याचे आदेश असल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आजच पगाराच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
….तर मंगळवारपूर्वी पगार खात्यात येणार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर वित्त विभागाकडून निधी सोमवारपर्यंत मंजूर झाला, तर एस.टी. कर्मचाऱ्यांना सोमवारी (25 ऑगस्ट) किंवा मंगळवारी (26 ऑगस्ट) पगार मिळण्याची शक्यता आहे. हे घडले, तर यंदा अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सणाच्या आधी पगार मिळणार आहे.
एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार?
गेल्या काही महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेकदा महिन्याच्या शेवटी वा पुढील महिन्यात पगार होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. सणासुदीच्या काळात खर्चाचे ओझे अधिक असल्याने वेळेवर पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यातच आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपती आधी मिळावा, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पगार गणपती आधीच झाल्यास एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.