पंतप्रधान मोदी यांच्या मॅक्रॉनशी चर्चा
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका केली स्पष्ट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. गुरुवारी दोन्ही नेत्यांमध्ये हा संवाद झाला. युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नसून केवळ शांततेच्या आणि सामोपचाराच्या मार्गानेच समस्या सुटू शकतात, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी या चर्चेत पुनरुच्चार केला, अशी माहिती देण्यात आली आहे.
युव्रेन आणि युरोप यांच्या सुरक्षेसंबंधी ठोस हमी मिळवून या युद्धाची समाप्ती व्हावी अशी युरोपियन देश आणि फ्रान्स यांची इच्छा असल्याचे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही देशांमध्ये परस्पर व्यापार आणि धोरणात्मक भागिदारी सुदृढ करण्यावर एकमत झाले आहे. व्यापार होत असताना परस्परांचे सार्वभौमत्व आणि निर्णय स्वातंत्र्य यांचा आदर राखला गेला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासारख्या संवेदनशील विषयावर जगाने एकात्म भूमिका घेण्याची आवश्यकता असून या संदर्भातही दोन्ही नेत्यांची चर्चा यावेळी झाली, असे स्पष्ट करण्यात आले. 2026 मध्ये भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासंबंधी जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीही चर्चा करण्यात आली.
बहुपेडी रचनेविषयी चर्चा
2026 मध्ये भारताकडे ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद येणार आहे. तसेच त्याचवर्षी फ्रान्सकडे जी-7 संघटनेचे अध्यक्षपद येणार आहे. जगाच्या राजकारणाची रचना बहुपेडी असली पाहिजे. तसेच, ती एकतर्फी असता कामा नये, असे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांचे मत आहे. त्यादिशेने दोन्ही देश यापुढेही कार्यरत राहणार आहेत. या विषयावरही दोन्ही नेत्यांनी विचारविमर्श केला आहे.
व्हाईट हाऊस बैठकीचा संदर्भ
तीन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये युरोपियन नेत्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बैठक झाली होती. ही बैठक रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात होती. या बैठकीत ब्रिटन, फ्रान्स. इटली, जर्मनी, फिनलंड, युरोपियन महासंघ आणि नाटोच्या प्रमुखांनी भाग घेतला होता. या देशांनी आणि संघटनांनी युक्रेनशी असलेल्या युरोपच्या घनिष्टतेचे प्रदर्शन केले. रशियाशी समझोता करायचा असेल तर युव्रेन आणि युरोप यांच्या सुरक्षेची हमी मिळणे आवश्यक आहे, असे या नेत्यांनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केले. या बैठकीचा संदर्भही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्या चर्चेला होता.
पुतीन यांच्याशीही चर्चा
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली होती. या चर्चेत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता. तथापि, समस्या शांततेच्या मार्गाने सोडविण्यावर सर्वसाधारण एकमत झाले होते. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून दिली होती. गुरुवारी फ्रान्सचे नेते मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेला या अलास्का बैठकीचीही पार्श्वभूमी होती. एकंदरीत, भूराजकीय परिस्थितीचा आढावा या चर्चेत घेण्यात आला.
पुढे काय होणार…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंबंधी कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावण्याची घोषणा मात्र केलेली आहे. परिणामी, या घडामोडींमध्ये भारताचे हितसंबंधही आता जोडले गेले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या 50 टक्के करापैकी 25 टक्के कर यापूर्वीच लागू झाला आहे. तर आणखी 25 टक्के कर 28 ऑगस्टपासून लागू होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा सध्या ठप्प आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये रशिया-युव्रेन युद्धाची कोंडी फुटली नाही किंवा भारत आणि अमेरिका यांच्यात काही तडजोड झाली नाही,
तर भारतावरचा 50 टक्के कर लागू होणार आहे. या स्थितीचा परिणाम भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर होणार अशी शक्यता आहे. या स्थितीचा विचार भारताला गांभीर्याने करावा लागणार आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. भारताने आजवर अमेरिकेच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. तसेच अमेरिकेला आव्हानही दिलेले नाही. ही परिस्थिती किती काळ राहील, यावर भारताच्या अमेरिकेशी असणाऱ्या व्यापारी संबंधांचे भवितव्यही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडावी, अशी मागणी आता होत आहे. यासंदर्भात आगामी चार दिवस महत्वाचे आहेत.
Comments are closed.