अभिनेत्रीला कॉंग्रेसच्या नेत्याचा आक्षेपार्ह संदेश

वादानंतर सोडावे लागले युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद

वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम

अभिनेत्री आणि मॉडेल रिनी एन. जॉर्ज आणि लेखिका हनी भास्करन यांच्या शोषणाशी निगडित आरोपानंतर काँग्रेस आमदार राहुल ममकूट्टाथिल अडचणीत आले आहेत. पलक्कडचे आमदार  राहुल ममकुट्टाथिल यांनी गुरुवारी केरळ युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी भाजपने बुधवारी पलक्कड आमदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ममकूट्टाथिल यांनी आक्षेपार्ह आणि चुकीचे मेसेज पाठविल्याचा आरोप मल्याळी अभिनेत्री रिनी एन. जॉर्ज यांनी केला आहे. याप्रकरणाची माहिती काँग्रेस नेतृत्वाला दिली होती, परंतु त्यांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप रिनी यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस नेत्याच्या संपर्कात आले होते. त्याचे गैरवर्तन तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. काँग्रेस नेत्याने मला अनेक आक्षेपार्ह मेसेज पाठविले. आमदाराने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करत असल्याचे सांगत मला तेथे येण्यास सांगितले होते, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

काँग्रेस नेतृत्वाकडून दुर्लक्ष

याप्रकरणाची तक्रार काँग्रेस नेत्यांकडे  केली होती, परंतु त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. काँग्रेस नेतृत्वाविषयी माझ्या मनात जी प्रतिमा होती, ती यामुळे काळवंडली आहे. माझ्या तक्रारीनंतरही काँग्रेसने राहुल ममकुट्टाथिल यांना अनेक पदे दिल्याची व्यथा रिनी यांनी मांडली आहे.

अन्य महिलांसोबतही गैरवर्तन

राहुल ममकुट्टाथिल यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या पत्नी आणि मुलींसोबत अशाचप्रकारे गैरवर्तन केले आहे. हे राजकारणी स्वत:च्या परिवाराच्या महिलांचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत, मग ते कुठल्या महिलेचे रक्षण करू शकणार असा प्रश्न रिनी यांनी उपस्थित केला.

लेखिका हनी भास्करन यांचाही आरोप

लेखिका हनी भास्करन यांनीही काँग्रेस आमदार राहुल ममकुट्टाथिल यांच्यावर गंभीर आरोप केले. काँग्रेस नेत्याने माझ्या सोशल मीडिया अकौंटवर अनेक वादग्रस्त मेसेज पाठविले होते असे त्यांनी म्हटले.

Comments are closed.