संसद सुरक्षा पुन्हा उल्लंघन
भिंतीवरून उडी मारून एक व्यक्ती गरुडद्वारपर्यंत पोहोचली : अटकेची कारवाई, चौकशी सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा एकदा भंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल भवनाच्या बाजूने झाडाचा आधार घेत भिंतीवरून उडी मारून एक अज्ञात व्यक्ती आत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. संसद भवन परिसरात प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती गरुडद्वारापर्यंत पोहोचली. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला अटक केली. आता याप्रकरणी आयबी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेसह अनेक केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.
संसद भवनाजवळ शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती झाडावर चढल्यानंतर भिंतीवरून उडी मारून संसदेच्या आवारात घुसली. त्याने रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून नवीन संसद भवनाच्या गरुड गेटपर्यंत धडक मारली. त्यानंतर संसद भवनात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून त्याची चौकशी सुरू केली आहे. सदर घुसखोर व्यक्तीने संसदेच्या आवारात घुसण्यासाठी झाडाचा वापर केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आता आयबी आणि विशेष शाखेचे अधिकारी त्याची चौकशी करून त्याच्या कृत्यामागील हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा घुसखोरीचा प्रकार उघड झाला आहे. यापूर्वी 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान, दोन तरुणांनी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारत पिवळसर धूर सोडला होता. दोघांनाही सभागृहात उपस्थित असलेल्या काही खासदारांनी पकडून सुरक्षा जवानांच्या स्वाधीन केले होते. याचदरम्यान संसदेच्या बाहेर त्यांच्या अन्य दोन साथीदारांनीही दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानांतर संसद भवनाची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्यात आली होती. ही एक अतिशय महत्त्वाची इमारत असल्याने, सुरक्षा दल त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. परंतु पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचे उल्लंघन झाल्याने तपास यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत.
Comments are closed.