रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल बीसीसीआयकडून मोठी अपडेट, ‘कोणालाही निवृत्ती…’

विराट कोहली रोहित शर्मासाठी पुढे काय: भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडून मोठं विधान समोर आलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कोहली आणि रोहित यांच्याविषयी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडलेलं नाही. शुक्ला यांनी सांगितलं की, हे दोन्ही खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचा वनडे क्रिकेटमधला विक्रम मोठा आहे.

अचानक समोर आलं बीसीसीआयचं मोठं विधान

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. आता वनडे क्रिकेटमधून त्यांच्या निवृत्तीच्या सामन्यांबद्दल चर्चा रंगू लागली आहे. याची तुलना लोक 2013 साली वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सचिन तेंडुलकर यांच्या निरोपाच्या सामन्याशी करत आहेत. यावर बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, “त्यांनी अजून निवृत्ती घेतली आहे का? नाही ना… मग तुम्ही त्यांच्या निवृत्तीबद्दल का बोलत आहात? इतकी चिंता करू नका. रोहित आणि कोहली दोघंही अजून वनडे क्रिकेट खेळत आहेत.”

निवृत्तीचं निर्णय खेळाडूंवरच…

राजीव शुक्ला पुढे म्हणाले, “बीसीसीआयचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही कोणालाही निवृत्ती घेण्यास सांगत नाही. तो पूर्णपणे खेळाडूंचा निर्णय असेल आणि आम्ही त्याचा आदर करतो. वेळ आल्यावर फेअरवेलच्या सामन्याबद्दलही विचार करू. सध्या विराट कोहली खूप फिट आहेत आणि रोहित शर्मा देखील चांगला खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्या फेअरवेलची इतकी घाई का?”

या दोन्ही दिग्गजांनी 2024 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची शक्यता

मे 2025 मध्ये आयपीएल संपल्यानंतर कोहली आणि रोहित यांनी काही दिवसांच्या अंतराने कसोटीतूनही निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर भारताने अजून वनडे मालिका खेळलेली नाही. पुढील वनडे मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. दरम्यान, कोहली आणि रोहित विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. हा त्यांचा 2027 वर्ल्ड कपमधील सहभाग निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र अजून काहीही अधिकृत झालेलं नाही.

हे ही वाचा –

Sanju Samson in Hospital : हाताला सलाईन अन्…; हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन, अचानक काय झालं? टीम इंडिया टेन्शनमध्ये

आणखी वाचा

Comments are closed.