वयाच्या 46व्या वर्षी ताहिरचा धडाका! ‘पंजा’ मारून रचला टी20 वर्ल्ड रेकॉर्ड; भुवनेश्वरशी केली बरोबरी

दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरसाठी वय हा फक्त एक आकडा आहे. 46 वर्षांचा असूनही तो क्रिकेटच्या मैदानावर खळबळ उडवत आहे. ताहिर सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2025 मध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्सचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेच्या नवव्या सामन्यात बारबुडा फाल्कन्सविरुद्ध त्याने शानदार गोलंदाजी करताना ‘पंजा’ मारला. ताहिरने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 21 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आणि इतिहास रचला. त्याने त्याच्या टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी तर केलीच पण एक विश्वविक्रमही मोडला.

खरं तर, ताहिर टी20 क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. त्याने 46 वर्षे 184 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. ताहिरने मलावीचा कर्णधार मोअज्जम अली बेगचा विक्रम मोडला आहे. मोअज्जमने सप्टेंबर 2024 मध्ये कॅमेरूनविरुद्ध ‘पंजा’ मारला.

ताहिरने आपल्या टी20 करिअरमध्ये पाचव्यांदा पाच बळी (फायफर) मिळवले आहेत. टी20 क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तरित्या सर्वाधिक फायफर घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची बरोबरी केली आहे.

ताहिर व भुवी व्यतिरिक्त श्रीलंकेचा माजी दिग्गज लसिथ मलिंगा, बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांनीही पाच-पाच वेळा फायफर झटके आहेत.

Comments are closed.