आशिया कपपूर्वी ड्रीम 11 OUT! स्पॉन्सरशिवाय खेळणार टीम इंडिया? ताज्या अपडेटने माजवली खळबळ

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला (बीसीसीआय) आशिया कप 2025 सुरू होण्याआधीच मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारतीय संसदेत पारित झालेल्या ‘ऑनलाईन गेमिंग विनियमन विधेयक 2025’ नंतर फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ने पैशाशी संबंधित सर्व गेम्स बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम भारतीय क्रिकेटवर होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रीम 11 आता भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर म्हणून करार पुढे चालवण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडिया ड्रीम 11 लोगोशिवाय मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलं, “देशाच्या कायद्यांचा आम्ही पूर्ण आदर करू. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात बीसीसीआय कधीच मागे हटणार नाही.”

ड्रीम 11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला होता. त्यानुसार प्रत्येक घरच्या सामन्यासाठी 3 कोटी आणि परदेशी सामन्यासाठी 1 कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र, नव्या विधेयकानंतर कंपनीला मोठं नुकसान होणार असल्याने स्पॉन्सरशीप करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या घडामोडीनंतर बीसीसीआय लवकरच नवीन जर्सी स्पॉन्सरसाठी बोली मागवणार असल्याची चर्चा आहे. पण, जर आशिया कप सुरू होण्यापूर्वी बोर्डला नवा स्पॉन्सर मिळाला नाही, तर टीम इंडिया या मोठ्या स्पर्धेत मुख्य स्पॉन्सरशिवाय उतरू शकते.

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळवला जाईल. स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये होणार असून सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जातील. या स्पर्धेसाठी भारताने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Comments are closed.