पक्षाच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपा मंथन

100 हून अधिक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा : बिहार निवडणुकीपूर्वी निवड अपेक्षित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल अपेक्षित आहेत. भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. न•ा यांना आधीच दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. आता लवकरच नवीन चेहरा आणण्याची तयारी सुरू आहे.

सध्या नवीन अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी चर्चांचे सत्र सुरू असलेले दिसते. आरएसएस आणि भाजप नेत्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक वरिष्ठ नेत्यांचे मत घेतले आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री आणि घटनात्मक पदांवर असलेले नेते यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपती निवडीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपला आपले उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मोठा विजय मिळवून द्यायचा आहे. सध्या संपूर्ण लक्ष या निवडणुकीवर असल्यामुळे भाजपाध्यक्ष निवडीला थोडाफार विलंब होत असला तरी बिहार निवडणुकीपूर्वी पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल अशी अपेक्षा आहे. भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा विजय हवा आहे. बिहार निवडणुकीपूर्वी नवीन अध्यक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्यासाठी किमान 19 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडावे लागतील. मात्र, सद्यस्थितीत उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटकसह 7 राज्यांमध्ये अध्यक्षाची निवडणूक अजून झालेली नाही. त्यातच इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांना मोठी पदे मिळत आहेत, तर जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी पक्षाने एक नवीन फॉर्म्युला आणला आहे. त्यानुसार मंडल अध्यक्षाचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि किमान 10 वर्षे पक्षाचा सक्रिय सदस्य असलेलाच जिल्हा आणि प्रदेशाध्यक्ष होईल, असे ठरविण्यात आल्याचे समजते.

Comments are closed.