ट्रम्प प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी 'लॉबिंग'
भारताने केला महत्वाच्या अमेरिकन कंपनीशी करार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तो दूर करुन ट्रम्प यांच्या प्रशासनाशी अधिक प्रभावी सुसंवाद स्थापित करण्यासाठी भारताने अमेरिकेतील ‘मर्क्युरी पब्लिक अफेअर्स’ नामक नव्या फर्मशी करार केला आहे. हा करार अमेरिकेच्या न्याय विभागाच्या विदेशी मध्यस्थ नोंदणी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आला असून तो 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे.
ट्रम्प प्रशासनाशी सुयोग्य आणि अधिक नजीकचा संपर्क साधण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी या फर्मला भारताकडून एकंदर 2 लाख 25 हजार डॉलर्सचे शुल्क दिले जाणार असून प्रत्येक महिन्यात 75 हजार डॉलर्स दिले जातील. त्या शुल्कात ही फर्म भारत सरकारला ट्रंप प्रशासनाशी धोरणात्मक आणि राजकीय स्वरुपाचा संपर्क साधण्यास साहाय्य करणार आहे. अमेरिकेत अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी ‘लॉबिंग’ करण्यास कायदेशीर अनुमती दिली जाते.
अन्य कंपन्यांशीही करार
भारताने या कामासाठी केवळ मर्क्युरी फर्मच नव्हे, तर इतरही काही कंपन्यांशी करार केले आहेत. एसएचडब्ल्यू पार्टनर्स एलएलसी या फर्मशीही भारताचा करार आहे. ही फर्म डोनाल्ड ट्रंप यांचे माजी सल्लागार जेसन मिलर यांची आहे. ही कंपनी भारताला ट्रंप प्रशासनाशी संपर्क अधिक सुदृढ करण्यासंबंधी साहाय्य करीत आहे. या कंपनीला भारत 18 लाख डॉलर्सचे वार्षिक शुल्क सध्या देत आहे.
आवश्यकता कशासाठी…
सध्याच्या काळात ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. 25 टक्के शुल्क यापूर्वीच लागू झाले असून आणखी 25 टक्के 28 ऑगस्टपासून लागू होत आहे. यामुळे भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या वस्तू निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे भारताने अमेरिकेला होणारी आपली निर्यात सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. हे करार याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून करण्यात आले आहेत.
पाकिस्तानचा खर्च अधिक
अमेरिकेत लॉबिंग करण्यासाठी पाकिस्तानने भारतापेक्षाही जास्त खर्च करणे चालविले आहे. पाकिस्तान यासाठी महिन्याला 6 लाख डॉलर्सचा खर्च करीत असून त्या देशाने एकंदर सहा अमेरिकन कंपन्यांशी या संबंधातील करार केले आहेत. या खेरीज पाकिस्तानने ऑक्टोबर 2024 मध्ये टीम ईगल नामक फर्मशी 15 लाख डॉलर्सचा करार केला आहे. पाकिस्तान अमेरिकेत भारतापेक्षाही अधिक आक्रमक लॉबिंग करताना दिसून येत आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.