शिक्षकांना शिक्षकेतर कामे दिली तर आदेशाची होळी करू, उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिक्षकांना शिक्षकेतर काम लादल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना तर गहू-तांदूळ निवडण्याचे काम दिले जाते. नको ती कामे दिली जातात. पण उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला नको ती कामे सांगितली तर त्यांचे आदेश घेऊन या आपण त्या आदेशाची होळी करून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आपण शिक्षकांना गुरुदेव म्हणतो. पण शिक्षक त्यांच्या घरातील गुरं नाहीत. कसेही हाकावे असे होणार नाही. माझ्या शिक्षकांचा दर्जा एवढा खालावलेला नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष व आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यपुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवाजी मंदिरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, आमदार महेश सावंत यांच्यासह शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण पद्धतीवर बोलताना त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरही भाष्य केले. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही; पण सक्ती कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनाप्रमुखांचा दंडक

कार्याचा अहवाल प्रकाशित करीत आहात. पण यापूर्वी कोणत्या शिक्षक आमदाराने त्याच्या कार्याचा अहवाल प्रकाशित केला नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी  सांगितली. यावेळी त्यांनी अभ्यंकर यांच्या कार्यशैलीचे आणि सभागृहातील कामगिरीचे कौतुक केले.

विद्यार्थी कार्यक्रम बघत असतील

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा सुरू झाल्या. यावर ते म्हणाले की, इतर कार्यक्रमात घोषणा चालतात. पण आज शिक्षकांचा कार्यक्रम आहे. हा लाईव्ह चालला असेल,  तुमचे विद्यार्थी बघत असतील. त्यामुळे उद्या वर्गात जाऊन गप्प राहा हे सांगण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे.

मतचोरी रोखा

तुमच्या हातात निवडणुकीचे काम आहे ते सांगता मग मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. तुम्हाला हजेरी घेण्याची सवय आहे. हजेरीपट घेऊन बसा मतदानाला कोणी दुसऱ्यांदा आला तर पुन्हा कसा हजर झालास, असे विचारा. प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकूच शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.