Ratnagiri News- कशेडी घाटाजवळ लक्झरी बसला आग, मुंबईहून कोकणात जाताना झाला अपघात

गणेशोत्सवासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या कोकणवासियांची गावाकडे जाण्याची लगबग सुरु आहे. मुंबईकरांना कोकणात वेळेत जाता यावं यासाठी एसटी महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. दरम्यान सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये ही खासगी बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.
रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ लक्झरी बसला आग, मुंबईहून कोकणात जात असताना झाला अपघात pic.twitter.com/tk8rwok355
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) ऑगस्ट 24, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस मुंबईतून मालवणात जाण्यासाठी निघाली होती. रविवारी पहाटे कशेडी बोगद्याच्या परिसरातून जात असताना या बसचा टायर प्रचंड गरम झाला आणि टायरने पेट घेतला. सुदैवाने बस चालकाचे लक्ष गेले आणि त्याने तातडीने प्रवाशांना सावध करुन बसमधून खाली उतरवले.यावेळी या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान प्रवाशांना बस मधून खाली उतरवल्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला होता. प्रवाशीही घाईत बसमधून उतरल्यामुळे त्यांना त्यांचे सामान सोबत घेण्याचाही वेळ मिळाला नाही. दरम्यान लगेचच खेड अग्निशमन दलाला तातडीने या घटेनची माहिती देण्यात आली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. या अपघाचाच बसचे प्रचंड नुकसान झाले. यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
Comments are closed.