हिंदुस्थानच्या ऐश्वर्य तोमरचा ‘सुवर्ण’वेध, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा

हिंदुस्थानच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरने 50 मीटर रायफल ‘थ्री पोझिशन’ प्रकारात अवघ्या 0.5 गुणांनी आघाडी घेत चीनच्या झाओ वेन्यू (587) याला पराभूत करीत आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. हिंदुस्थानने आतापर्यंत 26 सुवर्ण, 9 रौप्य व 11 कांस्य अशी एकूण 46 पदकांची लयलूट करीत पदकतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले.
दोन वेळा ऑलिम्पियन ठरलेल्या 24 वर्षीय ऐश्वर्यने या स्पर्धेत दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी 2023 मध्ये कोरियातील चांगवॉनमधील स्पर्धेतही तो विजेता ठरला होता. गेल्या वर्षी ऐश्वर्यने रौप्यपदक पटकाविले होते, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्याच्या नावावर तीन सुवर्णपदके आहेत.
हिंदुस्थानचे ऑलिम्पियन चेनसिंग व अखिल शेरोन या नेमबाजांनीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, मात्र अंतिम फेरीत ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले, मात्र सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानी त्रिकुटाला चीनकडून तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला.
इलावेनिल वलारिवनला सुवर्णपदक
हिंदुस्थानी ऑलिम्पियन इलावेनिल वलारिवनने 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर ‘एअर रायफल’ प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या विजयानंतर तिने सलग दुसऱया वर्षी वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 2024 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल हिने रौप्यपदक पटकाविले होते. तामीळनाडूच्या 26 वर्षीय इलावेनिलने अंतिम फेरीत अफाट एकाग्रता दाखवीत 253.6 गुणांची भक्कम कमाई केली. या कामगिरीमुळे तिने स्पर्धेत अव्वल स्थान मिळविण्याबरोबरच राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
कर्माकरचा ज्युनियर स्पर्धेत डंका
हिंदुस्थानचा उदयोन्मुख नेमबाज आद्रियान कर्माकरने अंतिम फेरीत 463.8 गुणांची विक्रमी कामगिरी करीत आशियाई ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकाविले. त्याने चीनच्या हान यिनानला 4.2 गुणांनी मागे टाकले. विशेष म्हणजे, आद्रियानने आठव्या स्थानावरून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, हे विशेष. याचबरोबर वेदांत वाघमारेने कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानच्या आणखी एक पदक जिंकून दिले. रोहित कन्यानने 575 गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे ज्युनियर सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानने सुवर्णपदक पटकावून जल्लोषात भर घातली.
Comments are closed.