दादा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत

हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱया दक्षिण आफ्ऱिका टी-20 हंगामात गांगुली प्रिटोरिया कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉटच्या जागी गांगुलीची निवड करण्यात आली असून, फ्रेंचायझी पातळीवर मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याची पहिलीच वेळ असेल. गांगुलीने प्रशिक्षकपद स्वीकारल्यामुळे प्रिटोरिया कॅपिटल्सला नवा आत्मविश्वास मिळेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या हंगामात गटात अव्वल स्थान मिळवल्यानंतरही अंतिम सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र संघाची घसरगुंडी सुरू झाली आणि मागील दोन हंगामांत (2023-24 आणि 2024-25) कॅपिटल्सला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच प्ले-ऑफमध्येही पोहोचता आले नाही. गांगुलीच्या दीर्घ क्रिकेट प्रवासातला हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिला अनुभव असला तरी नेतृत्वाचा प्रचंड अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

Comments are closed.