गांधींचा 'बुलेट' अवतार बिहारमध्ये दिसला
काँग्रेसचे ‘राम’चे सारथी होत पूर्णियाच्या रस्त्यांवर पळविली बाइक : तेजस्वी राहिले दूर
वृत्तसंस्था/ पूर्णिया
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात सुरू असलेली वोटर अधिकार यात्रा रविवारी पूर्णिया येथे पोहोचली. यादरम्यान राहुल गांधी यांची खास शैली दिसून आली. ते पूर्णियाच्या रस्त्यांवर बुलेट चालविताना दिसून आले. बाइकच्या मागील सीटवर बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम बसले होते. यादरम्यान तेजस्वी यादव त्यांच्यापासून काही अंतरावर दुसऱ्या बाइकवर दिसून आले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादांच्या मागे अनेक कार्यकर्ते बाइकवर नारेबाजी करत येत होते. राहुल गांधी यांच्या या बाइक अवताराचा व्हिडओ काँग्रेसच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. व्हिडिओत काँग्रेस आणि राजद दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बाइकवर सवार दिले. परंतु यादरम्यान तेजस्वी यादव दुसरी बाइक चालवत होते. राहुल गांधी यांना बुलेट चालविताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र होते.
राहुल गांधी यांनी पूर्णिया शहरात प्रवेश जीपमधून केला होता. परंतु शहरात पोहोचताच ते जीपमधून उतरत बुलेट चालवू लागले. यानंतर अररियापर्यंतचा प्रवास त्यांनी बुलेटद्वारेच पूर्ण केला आहे. हेल्मेट परिधानकरून बाइक चालविणाऱ्या राहुल गांधी यांच्या मागे बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार बसले होते, परंतु त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. यामुळे राजेश कुमार यांच्या हेल्मेटशिवाय बाइकवरून प्रवास करण्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.
युवकाने घेतली गळाभेट
पूर्णिया येथे एका युवकाने राहुल गांधी यांच्या बाइकसमारे येत त्यांची गळाभेटही घेतली आहे. परंतु यानंतर सुरक्षा पथकाने या युवकाला ताब्यात घेत चौकशी केल्याचे समजते. पूर्णिया जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ पूर्णिया शहर आणि ग्रामीणमध्ये त्यांनी सुमारे 30 किलोमीटरची यात्रा केली आहे. राहुल गांधी यांच्या या मतदार अधिकार यात्रेदरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जनतेशी थेट जोडले जाण्याचा प्रयत्न
राहुल गांधी हे जनतेशी थेट जोडले जाण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करत असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांदरम्यान जात त्यांच्याशी संवाद साधला होता. तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत दुचाकीवरून प्रवास करत त्यांनी समर्थकांना संदेश दिला असल्याचे मानले जात आहे.
Comments are closed.