सीआयएसएफ मधील महिला कमांडो युनिट
मध्यप्रदेशात एनएसजीप्रमाणे केले जातेय प्रशिक्षित : संवेदनशील ठिकाणी होणार तैनात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची संसद, दिल्ली मेट्रो, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई विमानतळासमवेत अनेक अन्य संवेदनशील ठिकाणी लवकरच सीआयएसएफच्या महिला कमांडो तैनात दिसून येणार आहेत. याकरता सीआयएसएफने पहिल्यांदाच ऑल वुमेन कमांडो युनिटची स्थापना केली असून यात 100 महिला कमांडो असणार आहेत.या महिला कमांडोंना देशातील सर्वोत्कृष्ट कमांडो मानण्यात येणाऱ्या एनएसजी कमांडोंप्रमाणे प्रशिक्षण दिले जात आहे. या महिला कमांडो दहशतवादी हल्ल्यापासून कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीवेळी चोख प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम असतील.
सीआयएसएफ स्वत:च्या पहिला ऑल वुमेन कमांडो टीमला मुख्य संचालनात्मक भूमिकेत सामील करण्यास पूर्णपणे तयार आहे. याकरता 30 महिलांची पहिली तुकडी 11 ऑगस्टपासून प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षण 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तर दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण 6 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती सीआयएसएफचे जनसंपर्क अधिकारी आणि डेप्युटी कमांडेंट सरोज भूपेंद्र यांनी दिली.
प्रशिक्षण पूर्ण होताच या महिला कमांडोंना वेगवेगळ्या अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. याकरता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या महिलांना मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या बरवाहा येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम प्रशिक्षक निवडण्यात आले असून ते या महिलांना एनएसजी कमांडोंप्रमाणे प्रशिक्षण देत असल्याचे सीआयएसएफ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण
प्रशिक्षणादरम्यान या महिला कमांडोंना एके-47, एमपी-5 पासून अन्य सर्वप्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रs हाताळणे, तातडीच्या स्थितीत त्वरित गोळीबार करणे, अनेक दिवसांपर्यंत अन्नाशिवाय राहण्याचे कसब शिकविले जात आहे. कुठल्याही प्रकारची इमारत, विमानतळ किंवा मेट्रो इत्यादी ठिकाणी दहशतवादी किंवा अन्य प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला कशाप्रकारे सामोरे जावे याचे धडे या महिला कमांडोंना देण्यात येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिला कमांडोंची क्यूआरटी आणि स्पेशल टास्क फोर्समध्येही नियुक्त केले जाणार आहे.
Comments are closed.